सरपंच पी. के. चौकेकर यांची मागणी..
⚡मालवण ता.३०-:
चौके बाजारपेठेत रस्त्याच्या मधोमध पडलेले खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत अशी मागणी चौके ग्रामपंचायतीचे सरपंच पी. के. चौकेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
चौके बाजारपेठेत रस्त्याच्या मधोमध पडलेले खड्डे यापूर्वी १८ ऑक्टोबर रोजी चौके ग्रामपंचायत आणि स्थानिक व्यापारी संघटनेने माती टाकून तात्पुरते बुजविले होते. परंतु दि. २४ ऑक्टोबर पासून पुन्हा पाऊस सुरू झाल्याने त्यातील माती वाहून गेली. या खड्ड्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविणे अवघड झाले आहे.. काही मोटरसायकलस्वार खड्ड्यामुळे पडले देखील असून थोडक्यात बचावले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे खड्डे पावसाळी डांबराने भरून घेतले असते तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती, असे सरपंच पी. के. चौकेकर यांनी म्हटले असून तातडीने उपाययोजना करून खड्डे बुजविण्यात यावेत अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामासाठी येत्या दोन – तीन दिवसात नवीन ठेकेदार नेमण्यात येणार आहे, असे सरपंच चौकेकर यांना कळविले आहे.
