राजाराम उर्फ आबा चिपकर:जिल्ह्यातील उमेदवारांवर अन्याय सुरूच राहिला तर मेडिकल कॉलेजसमोर ठाकरे सेना जनआक्रोश आंदोलन करणार…
⚡ओरोस ता.२८-: सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमधील कंत्राटी भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गोलमाल सुरू असल्याचे समोर आले आहे. शासनाकडून नियुक्त स्मार्ट कंपनीकडून उमेदवारांची अंतिम यादी कॉलेज प्रशासनाकडे सादर होऊन महिनाभर उलटला असतानाही जिल्ह्यातील उमेदवारांची कागदपत्र तपासणी अद्याप झालेली नाही. अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक राजाराम उर्फ आबा चिपकर यांनी दिली.
तर कॉलेजचे अधिकारी आणि कर्मचारी “पालकमंत्र्यांनी यादी थांबवण्याचे आदेश दिले आहेत” असे सांगत वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप त्यांनी केला असून यामुळे जिल्ह्यातील पात्र उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. असे देखील त्यांनी म्हटले आहे.
याबाबत दिलेला पत्रकात असे नमूद करण्यात आले की “जर पालकमंत्री नितेश राणे यांनीच जिल्ह्यातील उमेदवारांच्या नियुक्तीला मज्जाव केला असेल, तर ती बाब अत्यंत निषेधार्ह आहे. पालकमंत्र्यांनी याबाबत स्पष्ट खुलासा करावा.”
चिपकर यांनी पुढे सांगितले की, “मेडिकल कॉलेजमधील काही कर्मचारी स्वतःच्या नातेवाईक व ओळखीच्या उमेदवारांना भरती करून देण्यासाठी जाणूनबुजून प्रक्रिया लांबवत आहेत. यामुळे जिल्ह्यातील सुशिक्षित तरुण-तरुणींचे खच्चीकरण होत आहे.”लोकप्रतिनिधींची भूमिकाही या प्रकरणात संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले असून, जर जिल्ह्यातील उमेदवारांवर अन्याय सुरूच राहिला, तर मेडिकल कॉलेजसमोर जनआक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाने दिला आहे.
