पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्तक्षेपानंतर किल्ला पुन्हा खुला…

⚡मालवण ता.२८-:
मालवण येथील राजकोट किल्ला सार्वजनिक बांधकाम विभागाने काल सायंकाळी अचानक बंद केला असता स्थानिक नागरिक बाबल नरोना, नागेश परब, भाई चिंदरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची भेट घेऊन पर्यटन हंगाम सुरु असल्याने किल्ला सुरु करण्याची मागणी केल्यावर काल सायंकाळी ६ वाजल्यापासून किल्ला पुन्हा सुरु करण्यात आला. तसेच याबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी आजपासून राजकोट किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले आहेत.

वादळी स्थितीमुळे मालवण मधील सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक व जलक्रीडा बंद असल्याने दिवाळी सुट्टीत आलेले पर्यटक राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. अशातच काल सोमवारी सायंकाळी साडे चार वाजता राजकोट किल्ला सार्वजनिक बांधकाम विभागाने अचानक बंद करण्यात आल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला. मात्र आलेले पर्यटक राजकोट किल्ल्याच्या बाजूला असलेल्या खडकाळ समुद्र किनारी जात असल्याने वादळी स्थितीत कोणतीही दुर्घटना घडू नये तसेच ऐन पर्यटन हंगामात आलेल्या पर्यटकांचा हिरमोड होऊ नये यासाठी राजकोट येथील स्थानिक रहिवासी बाबल नरोना, नागेश परब, भाई चिंदरकर यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची भेट घेऊन किल्ला सुरु करण्याची मागणी केली. रहिवाशांची मागणी लक्षात घेऊन बांधकाम विभागाने काल सायंकाळी ६ वाजता पुन्हा सुरु केला.

दरम्यान या प्रकाराबाबत माहिती मिळताच भाजपचे गणेश कुशे, सुदेश आचरेकर, विजय केनवडेकर, तसेच नागेश परब, पराग परब, बबन रेडकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले. यावर पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी राजकोट किल्ला आजपासून सुरू करण्याचे निर्देश त्यांनी तहसीलदारांना दिले असल्याची माहिती गणेश कुशे यांनी दिली.

You cannot copy content of this page