अपघातग्रस्तांना वेळेवर मदत करत रूपा मुद्राळे आणि सुशांत पांगम यांनी दिले जीवदान…

⚡बांदा ता.२०-: बांदा येथे सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन जणांना तात्काळ मदत करत सामाजिक बांधिलकी जपत रूपा मुद्राळे व सामाजिक कार्यकर्ते सुशांत पांगम यांनी त्यांना जीवदान दिले.

गोवा येथील रहिवासी संतोष कुठेकर (वय ५०) व सानवी कुठेकर (वय ४७) हे बांद्यात सोमवारचा बाजार करण्यासाठी आले असता, गतिरोधकाचा अंदाज न आल्याने त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातस्थळी नेमकी उपस्थित असलेल्या रूपा मुद्राळे यांनी तात्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि मदतीसाठी धाव घेतली.

रूपा यांनी घटनास्थळी अनेक वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र जखमींची स्थिती पाहून कुणीही थांबण्यास तयार नव्हते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुशांत पांगम यांनी पुढाकार घेत, रूपा यांच्या मदतीने अपघातग्रस्तांना आपल्या वाहनातून तत्काळ बांदा येथील रुग्णालयात दाखल केले.

प्राथमिक उपचारानंतर अधिक योग्य उपचारासाठी दोघांनाही गोव्यातील बांबोळी येथील रुग्णालयात हलवण्यात आले. या मदत कार्यात रूपा मुद्राळे, सुशांत पांगम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता आणि माणुसकी ही खरोखरच कौतुकास्पद आहे.

या धाडसी व समाजाभिमुख कृतीमुळे दोन जीव वाचवण्यास मदत झाली असून, या कार्यासाठी दोघांच्याही सर्वत्र प्रशंसा होत आहे.

You cannot copy content of this page