ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनासाठी निरूखे येथे मसाला प्रशिक्षण कार्यशाळा,28 महिलांचा उत्स्फूर्त सहभाग…

⚡बांदा ता.१८-: कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत निरूखे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मसाले बनविण्याच्या प्रशिक्षण कार्यशाळेने ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनासाठी नवा मार्ग खुला केला आहे. या उपक्रमात ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील तब्बल 28 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच कीर्तिकुमार तेरसे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे प्रतिनिधी तसेच स्थानिक मान्यवर उपस्थित होते. दोन दिवसांच्या या प्रशिक्षणात महिलांना 21 प्रकारचे मसाले प्रत्यक्ष कृतीद्वारे तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच गुणवत्ता नियंत्रण, साठवणूक, पॅकेजिंग आणि मार्केटिंग यासंबंधी तांत्रिक व व्यावसायिक मार्गदर्शनही देण्यात आले. यामुळे महिलांना फक्त कौशल्यच नव्हे, तर स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा आत्मविश्वास प्राप्त झाला.
या प्रशिक्षणामुळे महिलांना घरबसल्या लघुउद्योग सुरू करण्याची संधी उपलब्ध झाली असून, त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशा उपक्रमांमुळे महिलांचा आर्थिक व सामाजिक सशक्तीकरणाचा पाया अधिक मजबूत होत आहे.
कोकण कला व शिक्षण विकास संस्था ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. अशा प्रशिक्षणांमुळे स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याची संधी वाढते आणि संपूर्ण गावाच्या विकासात महिलांचा सहभाग अधिक मोलाचा ठरतो. मसाले बनविण्याचे हे प्रशिक्षण ग्रामीण महिलांसाठी रोजगारनिर्मितीचा प्रभावी आणि टिकाऊ मार्ग ठरले असून, स्वावलंबनाच्या दिशेने त्यांचे पाऊल दृढ झाले आहे.
फोटो:-
निरूखे येथे प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या महिलांना प्रमाणपत्र देण्यात आली. यावेळी उपस्थित असलेले मान्यवर.

You cannot copy content of this page