Headlines

आसोली शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता.१८-: कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि आसोली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आसोली क्रमांक एक प्राथमिक शाळा व आसोली हायस्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिराचे उद्घाटन आसोली सरपंच बाळा जाधव, ग्रामविस्तार अधिकारी दत्तात्रय पवार, ग्रामपंचायत सदस्य शितल घाडी-जाधव, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रायकर, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. आवळे तसेच शिक्षकवर्ग आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या शिबिरात डॉ. सुदाम मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, तसेच कोकण संस्थेच्या समन्वयक स्वाती मांजरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ४५ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांची सर्वसाधारण शारीरिक तपासणी करून त्यांचे रक्तगट निश्चित करण्यात आले. तपासणी प्रक्रियेस हिंद लॅबच्या टेक्निशियन सौ. भाटकर यांनी सहकार्य केले.
या शिबिराचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या शारीरिक स्थितीची नियमित तपासणी करून आरोग्य सुधारास हातभार लावणे हे होते. ग्रामीण भागातील अशा शिबिरांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य समस्यांचे लवकर निदान होऊन योग्य उपचार मिळण्यास मदत होते, असा हेतू आयोजकांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका रायकर यांनी कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि आसोली ग्रामपंचायतीच्या पुढाकाराचे कौतुक करत अशा उपक्रमांचे सातत्य राखावे, अशी इच्छा व्यक्त केली.
फोटो:-
आसोली येथे विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

You cannot copy content of this page