बांदा / प्रतिनिधी:
येथील व्ही.एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये सन २००८ पासून एम.एस.ए.टी (M.S.A.T) विभागामार्फत इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण दिले जाते. या विभागामार्फत दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व कौशल्यविकासक उपक्रम राबविण्यात येतात.
यावर्षी दिवाळीच्या निमित्ताने एम.एस.ए.टी विभागामार्फत विद्यार्थ्यांनी उटणे आणि मेणबत्त्या स्वतः तयार केल्या. या वस्तूंची बांदा परिसरात तसेच शाळेत लोकोपयोगी सेवेअंतर्गत विक्री करण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्वावलंबन, उद्योगशीलता व विक्री कौशल्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई, एम.एस.ए.टी विभागाचे समन्वयक श्री. राकेश परब, निदेशक भूषण सावंत, निदेशिका श्रीमती रिया देसाई व सौ. गायत्री देसाई यांनी मार्गदर्शन केले.
या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे श्री. मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट चे चेअरमन मा. मंगेश कामत तसेच एम.एस.ए.टी समिती सदस्यांनी विशेष कौतुक केले.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची भावना वृद्धिंगत होत असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
