⚡बांदा ता.०३-:
जगविख्यात शल्यचिकित्सक आणि औषधनिर्माणशास्त्रातील संशोधक कै. डॉ. बी. बी. गायतोंडे यांच्या स्मरणार्थ बांदा येथील गोगटे–वाळके महाविद्यालयात आयोजित ज्ञानदीप व्याख्यानमालेत “महाराष्ट्रातील आरक्षणाचे राजकारण” या विषयावर राज्यशास्त्राचे अभ्यासक व मुंबई विद्यापीठ राज्यशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. सुरेंद्र जोंधळे यांनी आपले विचार मांडले.
या वेळी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश पवार उपस्थित होते.
डॉ. जोंधळे म्हणाले की, “महाराष्ट्रातील आरक्षणाचा प्रश्न हा केवळ जातीय अस्मितेचा नसून तो जात ओळख अधिक ठळक करणारा आहे. याचे मूळ स्थानिक राजकीय अर्थकारणात आहे. मराठा व ओबीसींच्या आरक्षणाच्या चळवळी या प्रस्थापित तसेच बदलत्या सामाजिक-राजकीय धुरीणत्वाला आव्हान देणाऱ्या आहेत. या दोन्ही आंदोलनांची सोडवणूक करणे हा मोठा पेच असून महाराष्ट्रातील प्रबोधनाची मूल्येच यातून मार्ग दाखवू शकतात. गावागावातील नागरीकरण आणि स्थलांतरामुळे वाढलेली असुरक्षितता ही आरक्षण मागण्यांमागील महत्त्वाची कारणे आहेत.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा. डॉ. अभिजीत महाले यांनी केले. त्यांनी डॉ. गायतोंडे यांच्या वैद्यकीय व शैक्षणिक योगदानाची माहिती देत व्याख्यानमालेचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर होते. शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रभारी अध्यक्ष प्रमोद कामत, तसेच राज्यशास्त्र विभागाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. किशोर म्हेत्री व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी डॉ. किशोर म्हेत्री लिखित ‘भंडारी समाजाचा राजकीय इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सुरेंद्र जोंधळे व डॉ. प्रकाश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. रमाकांत गावडे यांनी केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
