शालेय मुलांना वय-अधिवास दाखल्यांचे वितरण..
कणकवली –
तालुक्यातील कळसुली गावातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी आवश्यक असलेले दाखले मिळवण्यासाठी वारंवार पंचायत कार्यालय किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासू नये, यासाठी ग्रामपंचायत कळसुलीने पुढाकार घेतला. या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रातून एकाच वेळी १२१ विद्यार्थ्यांना वय-अधिवास प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे पालक व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून सर्वांनी ग्रामपंचायतीचे मनःपूर्वक आभार मानले.
यापुढे अन्य शैक्षणिक दाखलेही ग्रामपंचायत कार्यालयातूनच उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती सरपंच सचिन पारधिये यांनी दिली.
दाखला वितरण सोहळ्याला सरपंच सचिन पारधिये, उपसरपंच दत्ताराम परब, सदस्य गणेश मठकर, मानसी दळवी, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजू नार्वेकर, ग्रामस्थ प्रविण दळवी, जयवंत घाडीगांवकर, दिपक मेस्त्री, दिलिप सावंत, नंदकिशोर सुद्रिक, लाडू गांवकर, राजू खरात तसेच ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत वर्दम उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक टॉनी म्हापसेकर, चोडणेकर, राधिका कवडे आणि उल्का राऊळ यांचाही या कार्यक्रमात सहभाग होता. उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कळसुलीच्या या उपक्रमाचे कौतुक करून अभिनंदन केले.
