मालवण शासकीय तंत्रनिकेतनमध्ये उद्योजकतेवर व्याख्यान संपन्न…!

⚡मालवण ता.१६-:
विद्यार्थ्यांना उद्योगाची प्रत्यक्ष माहिती देऊन त्यांच्यात उद्योजकतेची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथील अन्न तंत्रज्ञान विभागामार्फत उद्योजकता संवर्धनासाठी विशेष व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमात मालवण येथील
झांट्ये काजू इंडस्ट्रिजचे मॅनेजर प्रशांतकुमार अंधारी व चौके येथील रुचिरा फूड प्रॉडक्ट्सचे मालक श्री. रोहित गावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी प्रशांतकुमार अंधारी यांनी विद्यार्थ्यांना काजू उद्योगातील विविध प्रक्रिया, आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर, कच्च्या मालाची उपलब्धता व मार्केटिंगच्या संधी यावर सखोल माहिती दिली. उद्योगातील सकारात्मक बाजूंबरोबरच आव्हाने, ग्राहक मानसशास्त्र, व्यवसायातील आत्मसमर्पण व स्वयंप्रेरणेचे महत्त्व, तसेच लघु उद्योगातील खर्च, कामगार व्यवस्थापन व होणाऱ्या चुका टाळण्याचे मार्ग त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. रोहित गावडे यांनी कोकणातील फळ प्रक्रिया उद्योगातील संधी, उत्पादनाची गुणवत्ता, मार्केटिंग, पॅकेजिंग व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून स्टार्टअप्स उभारण्याच्या संधी यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमानंतर प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी उद्योगासाठी अर्थपुरवठा, गुंतवणूक नियोजन, वितरण व्यवस्थापन व व्यवसायातील जोखीम पत्करण्याची तयारी यावर विचार मांडले. या उपक्रमामुळे करिअर निवड व स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त दिशा मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सृष्टी सावंत हिने केले. अन्न तंत्रज्ञान विभागातील अधिव्याख्याते श्री. प्रकाश शिरहट्टी व श्री. राहुल बोर्डे उपस्थित होते. विभागाचे प्रमुख श्री. संजय तलवारे व संस्थेचे प्राचार्य डॉ. दिलीप घायतिडक यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page