लॉकडाऊन काळात मच्छीमारी ठप्प;लाभ मिळण्यासाठी १० मे पासून आमरण उपोषण मेघनाथ धुरीं यांचा इशारा
मालवण (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने मच्छीमारांना विशेष आर्थिक पॅकेज मंजूर केल्यावर अद्यापही मच्छीमारांना त्याचा लाभ मिळालेला नाही. मत्स्य व्यवसाय विभागाच्या गलथान कारभारामुळे मच्छीमार आर्थिक लाभापासून वंचित राहिले आहेत. सध्याच्या कोरोना काळात मच्छीमारी व्यवसाय ठप्प असून संकट काळातही आर्थिक पॅकेजचा लाभ मिळणार नसेल तर पॅकेजचा उपयोग काय ? असा सवाल उपस्थित करत जो पर्यंत मच्छीमारांना आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत मालवण येथील सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय विभाग कार्यालयासमोर दि. १० मे पासून उपोषणास बसण्याचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार सहकारी संस्था फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन धुरी यांनी मालवण तहसीलदारांना सादर केले आहे. राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय खात्याकडून मच्छीमारांना विशेष आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. याबाबतची तरतूदही सहायक मत्स्यव्यवसाय विभागाकडे करण्यात आली आहे. हे विशेष आर्थिक सहाय्य मंजूर करण्याबाबत शासनाने जिल्हा लाभार्थी निवड व वितरण समिती नेमली आहे. या समितीत अशासकीय सदस्य म्हणून माझी नेमणूक शासनाने केली आहे. या समितीची सभा ८ एप्रिल रोजी झाली. त्यात जिल्ह्यातील मच्छीमारांना आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले असताना ज्या मच्छीमारांना विशेष आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले त्यांच्या खात्यावर अद्यापही ही मदत जमा झालेली नाही. या संदर्भात येथील सहायक मत्स्यव्यवसाय कार्यालयात चौकशी केली असता जे अकाऊंटंट आहेत ते गावी गेले आहेत. कोरोनाचे कारण पुढे करून ते अद्यापही कार्यालयात हजर झालेले नाहीत. एका शासकीय अधिकाऱ्यामुळे जिल्ह्यातील सुमारे चार हजार मच्छीमारांचे नुकसान होत आहे, असे मेघनाद धुरी यांनी निवेदनात म्हटले आहे. कोरोना काळात मच्छीमारांना जर आर्थिक मदत मिळत नसेल त्याचा उपयोगच काय? असा प्रश्न अध्यक्ष या नात्याने मला पडला आहे. तसेच या जिल्ह्यातील गरीब मच्छीमारांकडून आपल्याशी संपर्क साधून हे विशेष आर्थिक सहाय्य कधी मिळणार याबाबत विचारणा करत आहेत. माझी लढाई ही सहायक मत्स्यव्यवसाय कार्यालयातील प्रशासनाच्या विरोधात आहे. या गोष्टीचा विचार करून सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा विचार करत जिल्हा मच्छीमार सहकारी संस्थेचा अध्यक्ष म्हणून एकटाच १० मे रोजी सहायक मत्स्यव्यवसाय कार्यालयासमोर मच्छीमारांना आर्थिक मदत मिळेपर्यत सकाळी अकरा ते सायंकाळी पाच यावेळेत उपोषणास बसणार असल्याचा इशारा मेघनाद धुरी यांनी दिला आहे.
