सरपंच अक्रम खान यांची आक्रमक भूमिका : कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने नाराजी_
*💫बांदा दि.०३-:* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बांदा बसस्थानकात सफाई कामगार अभावी घाणीचे साम्राज्य पसरले असून प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या प्रकाराने नाराजी व्यक्त होत आहे. प्रवाशांनी केलेल्या तक्रारीनुसार आज सकाळी सरपंच अक्रम खान यांनी याठिकाणी धडक देत वाहतूक नियंत्रक यांना कडक शब्दात जाब विचारला. सावंतवाडी आगारातून तात्काळ सफाई कामगाराला बोलावून बसस्थानकाची साफसफाई करण्यात आली. बांदा बसस्थानक हे दशक्रोशीतील प्रवासी वाहतुकीसाठी महत्वाचे स्थानक आहे. या स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. गेले आठ दिवस बसस्थानकाची सफाई करण्यात न आल्याने स्थानकावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. कोरोनाचे संकट असताना प्रशासन लोकांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहे. मात्र बसस्थानकात असलेल्या कचऱ्याच्या समस्येकडे एसटी प्रशासन डोळेझाक करत असल्याने प्रवाशांनी याबाबत सरपंच अक्रम खान यांचे लक्ष वेधले. सरपंच खान यांनी तात्काळ याठिकाणी येत बसस्थानकाची पाहणी केली. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर, देवानंद कुबल, रिक्षा व्यावसायिक श्री. बांदेकर आदी उपस्थित होते. यावेळी वाहतूक नियंत्रकांना सरपंच खान यांनी जाब विचारला. तसेच तात्काळ याठिकाणी सफाई कामगार बोलावून सफाई करण्याच्या सूचना दिल्यात. आज दुपारपर्यंत संपूर्ण स्थानकाची एसटी प्रशासनाने साफसफाई केल्याने प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले.
