Headlines

सत्ताधाऱ्यांकडून विकासाच्या नावाखाली फेकाफेकी…

जनतेच्या प्रश्नांसाठी आठवडा आंदोलन छेडणार:हरी खोबरेकर यांचा इशारा..

⚡मालवण ता.०९-:
आम्ही गेले काही महिने सत्ताधाऱ्यांना विकासकामे करण्यासाठी संधी दिली होती. मात्र मालवण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली फक्त फेकाफेकी चालू आहे. गेले सत्ताधाऱ्यांकडून जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उबाठा शिवसेने तर्फे मालवण तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांवर आठवडाभर आंदोलन छेडण्यात येणार आहे, असा इशारा उबाठा शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

मालवण येथील ठाकरे शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद झाली, त्यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर हे बोलत होते. यावेळी उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, गौरव वेर्लेकर, महिला आघाडी प्रमुख दिपा शिंदे, किशोर गावकर, सुरेश माडये, प साद चव्हाण, दत्ता पोईपकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, मालवण बंदरजेटी परिसरात कोट्यावधी रूपयांची कामे करण्यात आलेली आहेत. याठिकाणी करण्यात आलेल्या रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाबत स्थानिकांनी वारंवार बंदर विभागाचे लक्ष वेधले होते. मात्र त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याने आज पहिल्या दहा दिवसांच्या पावसातच हे काँक्रीटीकरण वाहून गेले आहे. बंदर व मत्स्य विभागाचे मंत्री असलेल्या पालकमंत्री यांच्याच बंदर विभागाच्या कामात अशाप्रकारचे वातावरण असेल तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल याचा अंदाज बांधता येवू शकतो. या कामामध्ये अनियमीतता आणि भ्रष्टाचार झाल्याची शक्यता असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे ही अनियमीतता जाणिवपुर्वक केली जात आहे का? यातील पैसा कशासाठी वापरण्यात येणार आहे? ठेकेदार आणि अधिकारी यांना पाठिशी घालण्यात कशासाठी येत आहे? असे सवाल हरी खोबरेकर यांनी उपस्थित करून याची चौकशी होवून ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे, असेही श्री. खोबरेकर म्हणाले.

तसेच भुमीगत वीज वाहिन्यांच्या कामामुळे रस्ते खराब झाल्याने सातत्याने अपघात होत असताना त्याकडेही दुर्लक्ष होत आहे. यामुळे आता जनतेला सोबत घेऊन शासनकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी सलग आठ दिवस आठवडा आंदोलन वेगवेगळ्या विषयांवर करण्यात येणार आहे. जेणेकरून शासनकर्त्यांनाही त्यांची जागा दिसून येईल, असेही श्री. खोबरेकर म्हणाले आहेत.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांतून आलेल्या निधीतून सुरू असलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत, अशी टीका यावेळी हरी खोबरेकर यांनी केली. भूमीगत विज वाहिन्या, देवबाग धूपप्रतिबंधक बंधारा, मालवण बसस्थानक, अग्निशमन यंत्रणा, धामापूर नळपाणी योजना या कामांचे श्रेय हे तत्कालीन खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांचेच आहे. आम्ही केलेल्या पाठपुराव्यामुळे उपलब्ध झालेल्या निधीतून करण्यात आलेल्या कामांची उद्घाटने आणि भूमीपुजने सत्ताधारी पालकमंत्री, आमदार, खासदार करत आहेत. यामुळे त्यांनी सदरच्या कामांना मान्यता कधी आली, निधी कोणत्या शासनाने दिला याची उत्तरे जनतेला दिली पाहिजे, असेही श्री. खोबरेकर म्हणाले.

आमदार निलेश राणे हे सातत्याने गेल्या दहा वर्षात मालवण कुडाळ मतदार संघात निधी आणलेला नाही, असे सांगत आहेत. मग त्यांनी गेल्या काही महिन्यात केलेल्या विकासाकामांच्या उद्घाटनांचा निधी कोणी आणला होता? या प्रश्नांचे उत्तर त्यांनी द्यावे. गेल्या सहा महिन्यात मालवण कुडाळ मतदार संघात एकही रूपयांचा विकासनिधी आलेला नाही. ठाकरे शासनाच्या काळात मंजूर केलेल्या कामांना निधी आल्यानंतर विकासाकामे होत आहेत, असाही टोला श्री. खोबरेकर यांनी लगावला.

मच्छीमारांच्या विकासासाठी शासनाने गाबीत महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचे आम्ही कौतुकच केले आहे. मात्र मच्छीमारांना जातीच्या दाखल्यांसाठी अनेक अडचणी येत असताना त्याकडे कोणताही निर्णय घेतला जात नाही. मच्छीमारांना ज्या सुविधा पाहिजे त्या सोडविण्यासाठी शासन कोणतीही कार्यवाही करत नाही, आणि फक्त मतांवर डोळा ठेवून काहीतरी करत असल्याचे भासवत आहेत. आज मच्छीमार समाज जातीच्या पुराव्यांसाठी दारोदार भटकत आहेत, त्यांच्यासाठी तत्कालीन आमदार वैभव नाईक यांनी अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्नांवर शासनाने गांभिर्याने कार्यवाही करावी, अशी मागणीही श्री. खोबरेकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page