देवानंद लुडबे यांची मागणी..
⚡मालवण ता.०९-:
वायरी भूतनाथ मंदिर रोड कॉर्नर ते तारकर्ली रस्त्यावर वीज महावितरण कंपनीने भूमिगत वीज लाईन साठी रस्त्यावर मधोमध आडवे चर मारून खोदाई केली असून ते योग्य पद्धतीने बुजविले न गेल्याने त्याठिकाणी ये – जा करणाऱ्या वाहनचालक व पादचारी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्ववत करावा अन्यथा आम्ही स्व: खर्चाने चर बुजवू, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
याबाबतचे निवेदन देवानंद लुडबे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण यांना दिले आहे. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी, तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, वायरी उपसरपंच प्राची माणगावकर, योगेश्वर कुर्ले, पल्लवी खानोलकर, पराग माणगावकर, सुरेश तळवडेकर, मयूर तळगावकर, गणेश पाडगावकर आदी उपस्थित होते.
वायरी भूतनाथ मंदिर रोड कॉर्नर ते तारकर्ली रस्त्यावर वीज महावितरण कंपनीने भूमिगत वीज वाहिनी टाकण्यासाठी रस्त्यावर मधोमध आडवे चर मारले. परंतु ते चर पुन्हा योग्य रित्या भरून न बुजावल्याने
त्या ठिकाणी मातीचे ढिगारे झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना, सायकल – मोटारसायकल चालकांना, चारचाकी वाहनाना त्रास होत आहे. तसेच या ठिकाणी पावसाचे पाणी साचून अपघात होऊ शकतो. सदर रस्त्यावर अलीकडेच डांबरीकरण झाले होते. परंतु वीज कंपनीने ऐन पावसाळ्यात खोदाई करून प्रशासनाचा गलथान कारभार दाखवून दिला आहे. त्यामुळे तात्काळ डांबरीकरण अथवा सिमेंट काँक्रीट ओतून रस्ता समतल करणे गरजेचे आहे. परंतु याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. हा रस्ता पूर्ववत करावा, अन्यथा आम्ही स्व:खर्चाने खडी ओतून चरमय खड्डे बुजवणार, असे निवेदनात म्हटले आहे.
