Headlines

माजी विद्यार्थ्यांकडून श्री देवी माऊली विद्यालयाला क्रीडा साहित्य भेट

ब्लू स्टार क्रिकेट संघाच्या खेळाडूंचा शाळेप्रती कृतज्ञतेचा अनोखा उपक्रम

कुडाळ : श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथील ब्लू स्टार क्रिकेट संघाचे खेळाडू व विद्यालयाचे माजी विद्यार्थी यांनी आपल्या शाळेप्रती असलेली कृतज्ञता जपत विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासासाठी विविध क्रीडा साहित्य विद्यालयास भेट दिले.
विद्यालयास व्हॉलीबॉल नेट, दोन व्हॉलीबॉल, थाळी, लॉंग जंपसाठी रस्सी तसेच इतर आवश्यक क्रीडा साहित्य सुपूर्द करण्यात आले. या साहित्यामुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांचा सराव करण्यासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून, त्यांच्या क्रीडा कौशल्याला चालना मिळणार आहे.
यावेळी स्वप्निल चेंदवणकर, नाथा चेंदवणकर, गणपत चेंदवणकर, बाबुराव चेंदवणकर, रितेश चेंदवणकर आणि अनंत चेंदवणकर या ब्लू स्टार क्रिकेट संघाच्या खेळाडू व माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी “शाळेने आम्हाला घडविले असून, शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्येही आपला सक्रिय सहभाग राहील,” अशी ग्वाही दिली. माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून ‘शाळेने दिलेले संस्कार आणि शिक्षण यांची परतफेड समाजासाठी काहीतरी योगदान देऊन करावी’ हा आदर्श संदेश अधोरेखित झाला आहे.
या मोलाच्या योगदानाबद्दल संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या वतीने ब्लू स्टार क्रिकेट संघाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

You cannot copy content of this page