२४ तास अलर्ट राहण्याचे निर्देश; कामचुकार अधिकाऱ्यांना खुर्ची खाली करण्याचा इशारा..

⚡मालवण ता.१०-: संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मालवण-कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी पाणीटंचाई कृती आराखड्याच्या आढावा बैठकीत प्रशासनाला धारेवर धरले. पाणीटंचाई निवारणासाठी सर्व विभागांनी सतर्क राहून प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देतानाच निष्क्रियपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेताना आमदार राणे यांनी अभ्यासपूर्ण प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांना जाब विचारला. उपस्थितांचे प्रश्न समजून घेत त्यावर संबंधित अधिकाऱ्यांकडून उत्तरेही घेतली. प्रशासनाने जनतेच्या पाणीप्रश्नाबाबत २४ तास अलर्ट राहावे. ज्यांना काम करायचे नसेल त्यांनी खुर्ची खाली करावी, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी सुनावले.
यापूर्वी दोनदा बैठक रद्द झाल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर पुण्यात पाटेकर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट आणि आपणाला अचानक उद्भवलेले आजारपण यामुळे बैठक घेता आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी कुडाळ येथे पहिली आढावा बैठक घेण्यास आपणच घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच त्या अगोदर जिल्हातही याविषयीं बैठक घेण्यास आपण पुढाकार घेतल्याचे सांगितले
प स सदस्य दीपक सुर्वे यांनी आमदार निलेश राणे यांचे मानले आभार
या बैठकीत पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार मानले. चिंदर येथील नऊ एकर क्षेत्रातील तलावातील गाळ उपशासाठी आपण पत्र दिले होते. आता गाळ उपसा झाल्याने तलावात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला असून त्याचा फायदा परिसरातील चार गावांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आमदार राणे यांच्या कार्याचे अभिनंदन करणारा ठराव घेण्याची मागणी केली. मात्र, ही बैठक दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी असल्याने अभिनंदनाचा ठराव घेऊ नये, असे सांगत आमदार राणे यांनी विषयाचे गांभीर्य अधोरेखित केले. त्यांच्या या समयसूचक भूमिकेची बैठकीनंतरही चर्चा सुरू होती
