मालगुंड साहित्य संमेलनात होणार वितरण

कुडाळ : महाराष्ट्रात अग्रगण्य असणाऱ्या आणि मागील अनेक वर्षे मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती व साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारे सन २०२४-२५चे वाङ्मयीन आणि वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील स्त्री लेखिकेसाठीचा देण्यात येणारा ‘नमिता कीर विशेष लक्षवेधी पुरस्कार’ सिंधुदुर्ग माणगावच्या लेखिका स्नेहल माळकर फणसळकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण नोव्हेंबरमध्ये रत्नागिरी मालगुंड येथे होणार्या साहित्य संमेलनात केले जाणार आहे.
साहित्य परिषदेचा हा विशेष लक्षवेधी पुरस्कार मिळाल्याबद्दल स्नेहल माळकर- फणसळकर यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे. स्नेहल माळकर-फणसळकर या कोमसापच्या कुडाळ तालुक्याच्या उपाध्यक्ष असून त्यांची ‘स्नेहगंध’ व ‘मुक्त संवाद’ आणि मालवणी भाषेतील ‘गजालीन खाल्लो घो’ अशी तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
२०२४-२५ मधील सर्व पुरस्कारप्राप्त लेखकांचे कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक,केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर,केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा.डाॕ.प्रदीप ढवळ,विश्वस्त प्रमुख श्री.रमेश कीर,अभिनंदन केले आहे.
