बिगरपरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या चार डम्परवर बांदा पोलिसांची कारवाई…

⚡बांदा ता.१६-: बिगरपरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या चार डम्परवर बांदा पोलिसांनी तपासणी नाक्यावर आज कारवाई केली. ७२ हजार रुपयांच्या वाळूसह एकूण ४० लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चार जणांवर बांदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी दिलेली माहिती अशी की, इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी सुरु असताना ही कारवाई करण्यात आली. बांदा पोलिसात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. पहिल्या कारवाईत सचिन मोतीरामा (वय ४२, रा. गुढीपूर पिंगुळी, ता. कुडाळ, मुळ रा. शोरपूर कर्नाटक), चंदन कुमार सुखदेव सिंग (वय ३९, रा. पिंगुळी मुळ रा. हजारीबाग, झारखंड), अवधेश मुनेश्वर सिंह (रा. पिंगुळी, मुळ रा. राजपूर, झारखंड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या ताब्यातील डंपर एमएच ०७ एजे ७२२५, एमएच ०७ एयु ६९१९, एमएच ०७ एटी ६९१९ जप्त करून ५४ हजार रुपये किमतीची ९ ब्रास वाळू व ३० लाख रुपये किमतीचे डंपर जप्त करण्यात आले.
दुसऱ्या कारवाईत रघुनाथ मुकुंद गुंजकर (वय ३३, रा. हुमरमळा, वालावल, ता. कुडाळ) यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्या ताब्यातील जीए ११ टी ३१८६ या डंपर मधून बिगरपरवाना वाहतूक करण्यात येणारी १८ हजार रुपये किमतीची ३ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. तसेच दहा लाख रुपये किमतीचा डंपर ताब्यात घेण्यात आला. वरील सर्व वाहनातून शासनाची रॉयल्टी न भरता चोरट्या पद्धतीने वाळूची वाहतूक करताना कारवाई करण्यात आली आहे.
बांदा पोलिसात ४ वाहनांवर वाळू चोरीचे २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

You cannot copy content of this page