आपत्कालीन काळात मदतीसाठी तत्पर:नगरसेवक मंदार शिरसाट यांची संकल्पना..
कुडाळ : कुडाळ शहर ठाकरे शिवसेना, युवासेना आणि मंदार शिरसाट यांच्या माध्यमातून कुडाळ शहर मर्यादित शिव आपात सेनेची स्थापना करण्यात आली आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थतीत शिव आपात सेना शासकीय यंत्रणांच्या खांद्याला खांदा लावून लोकांसाठी काम करणार आहे, अशी माहिती युवासेनेचे जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट यांनी दिली.
ठाकरे शिवसेनेच्या कुडाळ येथील कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी तालुका प्रमुख राजन नाईक, शहर प्रमुख संतोष शिरसाट, तसेच उप जिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, महिला जिल्हा प्रमुख श्रेया परब, मेघा सुखी, संतोष अडूरकर, कृष्णा धुरी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंदार शिरसाट म्हणाले, कोकणात दरवर्षी जोरदार पर्जन्यवृष्टी होते. पावसाळ्यात झाडे पडणे किंवा वेगवेगळ्या आपत्ती येत असतात. या आपत्तीच्या काळामध्ये पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालय, नगरपंचायत, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याद्वारे आपत्तीच्या काळात मदत केली जाते. या संस्थांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना, युवासेना आणि नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या माध्यमातून शिव आपात सेना ही संघटना स्थापन करण्यात आली आहे, असे मंदार शिरसाट यांनी सांगितले.
श्री. शिरसाट पुढे म्हणाले, या संघटनेच्या माध्यमातून अतिवृष्टी किंवा आपत्तीचा काही प्रसंग येईल तेव्हा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते अशा ठिकाणी स्वतःच्या घरचे काम समजून त्या प्रत्येक ठिकाणी पोहोचतील आणि मदत करतील. यासाठी माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, तालुकाप्रमुख राजन नाईक, उपजिल्हाप्रमुख अमरसिंह सावंत, शहर प्रमुख संतोष शिरसाट, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, शहर महिला प्रमुख मेघा सुकी यांचे यासाठी सहकार्य लाभले आहे असे श्री शिरसाट यांनी सांगितले.
येत्या काळामध्ये जिथे जिथे पर्जन्यवृष्टी होईल, झाडे पडतील, कोणती आपत्ती निर्माण होईल त्या ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून तसेच सॉ कटरच्या माध्यमातून झाडे तोडण्याचे आणि बाजूला करण्याचे काम केले जाणार आहे. त्याचप्रमाणे शहरात ज्या ज्या ठिकाणी पाणी तुंबेल, पूरस्थिती येईल तेथील लोकांना विस्थापित करावे लागेल, तर त्या ठिकाणी देखील शिव आपात सेना काम करेल. या विस्थापित झालेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येईल. त्यांच्या भोजनाची आणि नाश्त्याची सर्व व्यवस्था शिव आपात सेना करेल. तसेच पावसाच्या दिवसात घरामध्ये पाणी शिरते, त्याबरोबर विषारी साप घरामध्ये घुसतात. तर अशा सापांना पकडण्यासाठी सर्पमित्रांची व्यवस्था देखील शिव आपात सेनेच्या माध्यमातून करण्यात येईल, असे श्री. शिरसाट यांनी सांगितले.
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन करतानाच 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारणाचा मंत्र दिला होता. हाच धागा पकडून शिव आपात सेनेच्या माध्यमातून पहिल्यांदाच कुडाळ शहरामध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. त्यासाठी मंदार शिरसाट यांनी आपला ९४०५८१२१२१ हा नंबर हेल्पलाइन नंबर म्हणून दिला आहे. जेव्हा जेव्हा लोकांवर एखादी आपत्ती येईल त्यावेळी या क्रमांकावर लोकांनी संपर्क साधावा. त्या ठिकाणी आमचा शिवसैनिक पोहोचून लोकांना जमेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
थोड्या दिवसात सगळ्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची यादी तयार होणार आहे. ती यादी सर्व लोकांपर्यंत पोहोचविण्यात येईल. तसेच शहरातल्या वाडी वस्तीवर कोणी अपंग बांधव असेल, वृद्ध आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी औषध पुरवठ्याची व्यवस्था देखील शिव आपात सेनेच्या माध्यमातून केली जाणार आहे. येत्या पावसाळी काळात जेव्हा जेव्हा आपत्ती येईल त्यावेळी लोकांना पूर्णपणे मदत करण्याचे शिवकार्य करण्यासाठी शिव आपात सेना तत्पर आहे, असा विश्वास मंदार शिरसाट यांनी शेवटी व्यक्त केला.
