सावंतवाडी : मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या सन १९९७-९८ च्या इयत्ता १० वी बॅचतर्फे शाळेस मदतीचा हात म्हणून शाळेच्या छप्पर दुरूस्तीसाठी आज रोख ३०,००० रक्कम प्रदान करण्यात आली.
आपण ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेप्रती आपण काहीतरी देणे लागतो, या उद्देशाने मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव विद्यामंदिराच्या इमारतीच्या नुतनीकरणासाठी पुन्हा एकदा एकत्र येत तसेच विद्या मंदिराच्या या पवित्र गुरु शिष्याच्या नात्याला उजाळा देऊन ती यशस्वी परंपरा झळकत ठेवण्यासाठी या बॅचच्यावतीने शाळेसाठी ही मदत करण्यात आली. १९९७-९८ चे माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी जमा केलेली रुपये ३०,००० रक्कम शाळेचे मुख्याध्यापक मारुती फाले यांच्याजवळ सुपूर्द करण्यात आली. यावेळी शंकर होळकर, निलेश ठाकूर, सुचिता नार्वेकर-धुरी, रुपेश कातळकर, मानसिंग शिरोडकर, जयशंभो सावंत, गणेश राऊळ, उमेश पावसकर आदी माजी विद्यार्थ्यांसह शाळेचे पर्यवेक्षक सुनील कदम, शिक्षक विठ्ठल सावंत, ओमप्रकाश तिवरेकर, संदीप कारिवडेकर, प्रकाश केसरकर, अभिजित गावडे, प्रज्ञा मातोंडकर आदी उपस्थित होते. शाळेसाठी ही मदत केल्याबद्दल मुख्याध्यापक मारुती फाले यांनी पुष्पगुच्छ देऊन या बॅचचे आभार व्यक्त केले. १९९७-९८ या बॅचने केलेल्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या १९९७-९८ बॅचतर्फे शाळेस ३०,००० रक्कम प्रदान…
