⚡मालवण ता.०१-:
प्रधानमंत्री आवास योजना २.० ची अंमलबजावणी मालवण शहरात नगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आली असून शहरातील बेघर नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले आहे.
मालवण नगरपालिकेकडून मामा वरेरकर नाट्यगृह येथे प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत आयोजित लाभार्थी मार्गदर्शन मेळावा झाला. मेळावा मुख्याधिकारी संतोष जिरगे व वेंगुर्ले नगरपरिषदेचे प्रधानमंत्री आवास योजनेचे शहर अभियंता प्रतिक डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा नागरिकांना ज्या राहण्यासाठी पक्के घर नाही किंवा कच्चे घर आहे व आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, अशा नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना २.० बद्दल माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या योजनेचा लाभ घेऊ इच्छीणाऱ्या नागरिकांनी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नगरपालिकेकडून योजनेबाबत माहिती देण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजनेचे तांत्रिक तज्ज्ञांनी अर्ज कसा करावा, योजनेतील लाभार्थी पात्रता, अनुदान वितरण कसे होते, लागणारी आवश्यक कागदपत्रे इत्यादीबद्दल मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर घरकुलांना पालिकेकडील परवानगी घेण्यासाठीच्या प्रक्रियेबाबत प्रभारी रचना सहाय्यक सुधाकर पाटकर यांनी मार्गदर्शन केले. लाभार्थ्यांनी अर्ज सादर करण्यापासून घरकुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत नगरपालिकेकडून लाभार्थ्यांना सहकार्य केले जाईल, असे नगरपालिकेकडून आश्वासन देण्यात आले असून शहरातील सर्व बेघर नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले आहे.
