मालवण दक्षता समिती बैठकीत पोलिसांचे आवाहन..
⚡मालवण ता.०१-:
आगामी काळात होळी गुढीपाडवा, होळी, धुलीवंदन, रमजान ईद सारखे सण साजरे होणार आहेत. या सणांच्या पार्श्वभूमीवर समाजात शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरण कायम ठेवणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. नागरिकांनी दक्ष राहत अपप्रवृत्तींना थारा देऊ नये, असे आवाहन पोलिस उप अधीक्षक घनःश्याम आढाव यांनी मालवण येथे शांतता समितीच्या बैठकीत केले.
मालवण पोलिस ठाण्यात आज उपविभागीय पोलीस अधिकारी घनःश्याम आढाव यांच्या अध्यक्षतेखाली व पोलिस निरीक्षक कोल्हे यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक झाली. यावेळी ॲड. समीर गवाणकर, हसरत खान, जॉन नऱ्होना, भाऊ सामंत, अवि सामंत, संदीप बोडवे, जाबीर खान, ललित चव्हाण, बाबी जोगी, श्रीराज बादेकर, मुस्ताक अथणीकर, नदीम मुजावर, गणेश चव्हाण, अनिकेत फाटक, समीर गोवेकर, सलाम मुजावर, अलीम खान, तेजस चव्हाण, रफीक शेख आदी उपस्थित होते.
मालवणात राष्ट्रविरोधी घोषणा देऊन शांतता बिघडविणाऱ्या व अनेक कृत्यात सहभाग असलेल्या त्या भंगारवाल्यांच्या भावासह त्याच्या कुटुंबियांना इथे कोणत्याही स्वरूपात थारा देऊ नये अशी सर्वानुमते मागणी शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आली.
यावेळी बोलताना ॲड. गवाणकर म्हणाले, गोळवण मध्ये जो प्रकार घडला आहे. त्यामुळे अनधिकृत वास्तव्याच्या घटना चर्चेला आल्या आहेत. परप्रांतीय नागरिकांना सहजपणे आणि चुकीच्या पद्धतीने रेशन कार्ड, घरपत्रक उतारे मिळत असतील तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. मालवण मधील भंगारवाल्यावरील कारवाईं प्रकरणात त्याने संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्या असतील तर त्या समोर येऊ शकतात. यासाठी त्याच्या जवळील सामानाची पोलिसांनी तपासणी करणे आवश्यक होते. मिडिया ट्रायलला कोणताही वाव मिळू नये यासाठी प्रशासनानेही काळजी घ्यावी अशी सूचना ॲड. गवाणकर यांनी केली. गोवंश पलायन करण्यामागे काही गाड्या सामील आहेत. पोलिसांनी यात सतर्कता बाळगणे असेही गवाणकर यांनी सांगितले.
मालवण शहरात आणि गावागावात फिरणाऱ्या भंगारवाल्यांकडे सर्रास करून संशयाने पाहिले जाते. त्यात काही प्रामाणिकपणे व्यवसाय करत आहेत. अशा भंगारवाल्यांना प्रशासनाने स्वतंत्र ओळखपत्र वितरीत करावे अशी सूचना हसरत खान यांनी केली. तर बनावट आधारकार्ड जवळ बाळगून अनेकजण फिरत असतात. लोकांमध्ये अशा मुळे संशयाचे वातावरण निर्माण होते. यासाठी पोलिस यंत्रणेकडे स्थानिक पातळीवर आधारकार्ड व्हेरिफिकेशन यंत्रणा उपलब्ध असावी अशी मागणी अवि सामंत यांनी केली. फेरीवाले किंवा किनारपट्टीवर हातगाडीवाले नाव बदलून व्यवसाय करत आहेत याकडे भाऊ सामंत यांनी लक्ष वेधले. हा सुद्धा फसवणुकीचा प्रकार असल्याचे सामंत यांनी सांगितले. अशा प्रकारांना आळा बसावा अशी त्यांनी मागणी केली.
मालवण मध्ये सर्व जाती पंथाचे नागरिक सलोख्याने वागत आले आहेत. एकमेकांच्या सणाउत्सवात सामील होत आले आहेत. मुस्लिम समाजानेही आपल्या समाजात अपप्रवृत्तींना थारा देऊ नये असे आवाहन बाबी जोगी यांनी केले.
आम्ही कुणालाही इथे येऊन व्यवसाय करू नका असे म्हणणार नाही. परंतु कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठीशी घालणार नाही. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तिबाबत आम्हाला कळवा. कुणीही कायदा सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य करू नये. दोन किंवा त्या पेक्षा अधिक गुन्हे दाखल असतील तर पोलिस अशा व्यक्तीच्या विरोधात तडीपारीची कारवाई करू शकतात असे पोलिस उप विभागीय अधिकारी आढाव यांनी सांगितले.
म्हाडा कॉलनीत काही अनैतिक प्रकार चालत असल्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. यावर त्या ठिकाणी आजच पोलिस पथक पाठविण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक कोल्हे यांनी सांगितले. अन्य ठिकाणीही तुम्हाला काही संशयास्पद, अनधिकृत वावर आढळून आल्यास पोलिसांना त्वरित कळवा. येणाऱ्या सणांच्या काळात शांतता राखा, असे आवाहनही त्यांनी केले.
