मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन..
⚡मालवण ता.०१-:
राज्यातील गाबीत समाजातील विविध सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी आणि विशेषत:”गाबीत समाज आर्थिक विकास महामंडळ” स्थापन करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडे विशेष बैठक आयोजित करून आवश्यक ते निर्णय शासनस्तरावरून घेण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री ना.नितेश राणे यांनी गाबीत समाज महाराष्ट्र संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
गाबीत समाज महाराष्ट्र संस्थेचे अध्यक्ष सुजय धुरत, सरचिटणीस बाळ मणचेकर, खजिनदार प्रवीण सरवणकर, भाई चिंदरकर, अजय मणचेकर यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन गाबीत समाजाचे विविध प्रश्न मांडले. गाबीत समाजातील संपूर्ण किनारपट्टीमध्ये राहणाऱ्या मत्स्यव्यवसायिकांचे प्रश्न, आनंदवाडी बंदर विकास प्रकल्प, गाबीत समाजातील जातीच्या दाखल्यांचे प्रश्न, मच्छीमारांच्या घरांच्या जागांचे प्रश्न आणि गाबीत समाजाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी “गाबीत समाज आर्थिक विकास महामंडळ” स्थापन करण्याविषयी पदाधिकाऱ्यांनी मंत्री नितेश राणे यांच्याशी चर्चा केली.
यावेळी मंत्री नितेश राणे यांनी समाजकल्याण विभाग व सामाजिक न्याय मंत्र्यांशी बोलून या संदर्भात लवकरच विशेष बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. देवगड आनंदवाडी येथील मत्स्य प्रकल्पाचे काम जोमाने व लवकर पूर्ण होण्यासाठी जास्तीचा निधी मिळावा अशीही मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.
