⚡मालवण ता.०१-:
मालवण दांडी येथील दांडेश्वर मंदिर ते सिंधुदुर्ग या जलमार्गावरील वाहतूक परवानगीवर घातलेली स्थगिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डा कडून उठविण्यात न आल्याने या विरोधात तेथील पर्यटन व्यवसायिकानी पुकारलेल्या उपोषणास मनसेचा पाठिंबा आहे, असे मनसेचे मालवण शहराध्यक्ष सागर जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
२०१६ मध्ये दांडेश्वर मंदिर ते सिंधुदुर्ग किल्ला या प्रवासी जलवाहतुकीस परवानगी देण्यात आली असताना महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या मनमानी कारभारामुळे हि जलवाहतूक पडली आहे. या मार्गावर प्रवासी होडी वाहतूक करणाऱ्या पर्यटन व्यावसायिकांच्या पोटावर पाय आणण्याचे काम हे संबंधित विभागाकडून केल्याचे दिसत आहे. त्याठिकाणी विना अपघात सेवा सुरू असताना अचानक अशी कोणती उपरती अधिकाऱ्यांना झाली? की ज्यामुळे ही होडी सेवेवर स्थगिती आणावी लागली ? अधिकाऱ्यांनी वेळोवेळी खोटी आश्वासने देऊन पर्यटन व्यावसायिकांची फसवणूक केली आहे. असे अधिकारी पर्यटन व्यावसायिकांचा आर्थिक ह्रास करून देशोधडीला लावण्याचे काम करत आहेत. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात जो उपोषणाचा बडगा स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी उभारला आहे, त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पूर्ण पाठिंबा राहील, असे मनसे शहराध्यक्ष सागर जाधव यांनी सांगितले.
