दांडेश्वर मंदिर ते सिंधुदुर्ग किल्ला जलमार्गावरील वाहतूक परवानगीची स्थगिती न उठविल्यास उपोषण छेडणार…

⚡मालवण ता.२८-:
मालवण दांडी येथील श्री दांडेश्वर मंदिर ते सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी असलेल्या व्यवसायिकांना बोटीतील चढउताराचे व सुरक्षिततेचे कारण देऊन प्रवासी वाहतूक करण्याबाबत महाराष्ट्र सागरी मंडळाने नोव्हेंबर २०२२ मध्ये स्थागिती दिली होती. मात्र याच जलमार्गावर प्रवासी वाहतुकीसाठी दांडेश्वर मंदिरासमोरील समुद्र किनाऱ्यावर महाराष्ट्र सागरी मंडळाकडून तरंगती जेटी उभारून उभारून दोन महिने उलटले तरी देखील व्यवसायिकांच्या परवानगीवर घातलेली स्थगिती अद्यापही उठविण्यात न आल्याने व्यवसायिकांना जेटी असूनही व्यवसाय करता येत नसल्याचे या व्यवसायिकानी आज पत्रकार परिषदेत सांगत सदर स्थगिती न उठविल्यास तसेच परवानगीसाठी अर्ज केलेल्या चार जणांना उद्देशपत्र न दिल्यास ३ मार्च रोजी सकाळी ११ वा. मालवण बंदर विभाग कार्यालया समोर उपोषणास बसू, असा इशारा दिला.

मालवण येथील हॉटेल कोणार्क येथे या व्यवसायिकानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मेघनाद धुरी, सौ. सुमेधा धुरी, विठ्ठल केळूसकर, संतोष केळूसकर, महादेव कोयंडे, संतोष परब, रुपेश प्रभू, रश्मीन रोगे आदी उपस्थित होते.

यावेळी व्यवसायिकांच्या वतीने मेघनाद धुरी म्हणाले, दांडेश्वर मंदिर ते सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर प्रवासी वाहतूक करण्यास सौ. सुमेधा मेघनाद धुरी व श्री. विठ्ठल रामदास केळुसकर या दोघांना महाराष्ट्र सागरी मंडळाकडून २०१६ पासून परवानगी देण्यात आली होती. परवानगी प्रमाणे प्रवासी वाहतूक चालू होती. मात्र त्यानंतर दि. १२ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रवाशांना बोटीमध्ये चढउतार करण्यासाठी सुरक्षित व्यवस्थेच्या कारणास्तव सहाय्यक बंदर निरिक्षक, मालवण यांनी स्थगिती दिली. या मार्गावर दोघांच्याही बोटीबाबत व चढउतारबाबत कोणाही पर्यटक प्रवाशांची कोणतीही तक्रार नसताना व कोणताही अपघात नसताना अशा प्रकारची स्थगिती देण्यात आली. या मार्गावर प्रवासी पर्यटनाला परवानगी देण्यासाठी अर्ज केलेल्या अजून चार जणांनी व परवानगी असलेल्या दोन अशा एकूण सहा व्यवसायिकानी २५ नोव्हेंबर २०२३ रोजी उपोषण केल्यानंतर मुख्य बंदर अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई यांच्याशी झालेल्या चर्चेअंती दांडेश्वर मंदिर येथे किनाऱ्यावर महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने तरंगती जेटी उभारून देण्याचे मान्य करण्यात आले.

त्यानंतर महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्यावतीने एक वर्ष निविदा प्रक्रिया राबवून संबंधीत ठेकेदारामार्फत दि. २७ डिसेंबर २०२४ रोजी दांडेश्वर मंदिर किनारी तरंगती जेटी उभारण्यात आली. त्याचे उदघाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते दि.७ जानेवारी २०२५ रोजी झाले. परंतु जेटी उभारून दोन महिना झाले तरी महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई यांनी परवानगी असलेल्या दोन्ही व्यवसायिकांवरील स्थगिती उठविलेली नाही तसेच परवानगीचे नुतनीकरण दिलेले नाही. तसेच या मार्गावर परवानगी मागितलेल्या अन्य चार व्यवसायिकांना परवानगी देण्यासाठी उद्देशपत्र देणे गरजेचे असून त्या बाबतही कोणतीही कार्यवाही केलेली नाही, यामुळे या मार्गावर प्रवासी वाहतूक करता येत नसल्याने व्यवसाय ठप्प पडला आहे, असेही मेघनाद धुरी यांनी सांगितले. सागरी मंडळानेच जेटी उभारली असताना ज्या सुरक्षेच्या कारणासाठी स्थगिती दिली होती ती स्थगिती उठवली जात नसेल तर यावरून सागरी मंडळाला आपणच बांधलेल्या जेटीवर विश्वास नाही का ? असा सवालही श्री. धुरी यांनी उपस्थित केला.

त्यामुळे दोन व्यवसायिकांना परवानगीचे नुतनीकरण व चार जणांना परवानगीबाबतचे उद्देशपत्र देण्यात यावे. तसेच मालवण बंदरामध्ये श्री देव दांडेश्वर मंदिर ते सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर देण्यात आलेल्या परवानगीची स्थगिती उठवून परवानगीचे नुतनीकरण करुन देण्यात यावे, अशी आमची मागणी असून तसे न झाल्यास सहाही व्यावसायिक ३ मार्च रोजी मालवण बंदर निरीक्षक कार्यालय समोर उपोषणास बसतील,
याबाबतचे निवेदन महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे, असेही श्री. धुरी यांनी यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page