सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मध्ये ४५ वर्षावरील खेळाडूंचे १२ संघ सहभागी:सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनचे आयोजन..
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने १ आणि २ मार्च रोजी कुडाळ तहसील कार्यालयाच्या बाजूच्या मैदानावर ४५ वर्षावरील खेळाडूंची क्रिकेट स्पर्धा होणार आहे. जिल्ह्यातल्या वैभववाडी वगळता उर्वरित सात तालुक्यातील ४५ वर्षे वयावरील १५८ खेळाडूंची १२ संघात विभागणी करण्यात आली असून ते संघ पहिल्या दिवशी साखळी पद्धतीने तर दुसऱ्या दिवशी बाद पद्धतीने एकमेकांशी खेळतील. यावेळी क्रीडा क्षेत्रातील नामवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख रु. ११ हजार १११ आणि चषक, उपविजेत्या संघाला ७ हजार ७७७ आणि चषक देण्यात येईल तसेच इतर वैयत्तिक बक्षिसे देखील देण्यात येणार आहेत. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष काका कुडाळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बबन परब, गोपाळ वेंगुर्लेकर, दीपक कुडाळकर, सुनील धुरी, संदीप रुद्रे , राजू पाटणकर उपस्थित होते. काका कुडाळकर.म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन म्हणून आम्ही गेल्या पाच वर्षांपूर्वी ही क्रिकेट संघटना स्थापन केली आहे. व्यावसायिक क्रिकेट खेळता खेळता 45 वय निघून गेल्यानंतर खेळण्याची इच्छा असली तरी वयाच्या मर्यादेनुसार व्यावसायिक स्पर्धात्मक क्रिकेट खेळता येत नाही आणि मग अशावेळी क्रिकेटमधली आपली इच्छा आणि हौस पूर्ण करण्यासाठी जे जे खेळाडू 45 वर्षांवरील क्रिकेट खेळू इच्छितात त्यांच्यासाठी आम्ही हौशी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन स्थापन केले आहे. हे स्थापन करण्यासाठी अनिल हळदीवे यांनी फार मोठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे त्यांच्याच अध्यक्षतेखाली ही संघटना स्थापन करण्यात आली आहे. त्या संघटनेमध्ये मी काका कुडाळकर स्वतः उपाध्यक्ष आहे, बबन परब ही जिल्ह्याचे खजिनदार आहेत, बाबली वांगणकर हे सचिव म्हणून काम करतात. त्याचबरोबर सुनील धुरी, रिझवान, वासू वरवडेकर, विजय जाईल, शरद शिरोडकर, अभय भिसे, उमेश मांजरेकर अशी बरीच मंडळी या ठिकाणी जिल्हा संघटनेचा कार्यभार सांभाळत आहेत.
त्याचप्रमाणे तालुक्याचाही प्रत्येक तालुक्याला ही एक संघटना आम्ही कार्यरत केली आहे . सुनील धुरी हे कुडाळचे तालुकाध्यक्ष आहेत. राजू पाटणकर खजिनदार आहेत. तसेच गोपाळ वेंगुर्लेकर, संदीप रुद्रे, दीपक कुडाळकर, श्रीकृष्ण सामंत, नाना कुडाळकर, शैलेश प्रभू, प्रवीण नेरुरकर यांच्या बरोबरच कुडाळचे राम राऊळ हे सेक्रेटरी म्हणून काम करत आहेत. याशिवाय बरीच मंडळी तालुक्यामध्ये काम करत आहेत.
गेली तीन वर्ष सिंधुदुर्ग प्रीमियर लीग या संकल्पनेतून आम्ही ही स्पर्धा आयोजित करत आहोत. पहिली दोन वर्ष मालवण येथे, त्यांनतर वेंगुर्ला आणि यंदा कुडाळमध्ये होणाऱ्या स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. प्रामुख्याने जिल्हाभरात आमच्याकडे ४५ वर्षावरील २०० पेक्षा जास्त खेळाडू हे सभासद म्हणून सहभागी झालेले आहेत. ज्यांना खेळायची इच्छा आहे त्यांची नोंदणी केल्यानंतर बारा संघांमध्ये त्यांची विभागणी होते. सध्या आमच्याकडे 158 पेक्षा जास्त खेळाडूंनी नोंदणी केलेली आहे. त्यांचे आम्ही बारा संघ तयार केले आहेत. या बारा संघांमधून एक आणि दोन मार्च रोजी कुडाळ तहसील नजीकच्या मैदानावर ही स्पर्धा संपन्न होणार आहे.
बारा संघ, संघ मालक आणि आयकॉन खेळाडू
जिल्ह्यातील सर्व खेळाडू हे या बारा संघांमध्ये विभागले जातात. त्यामध्ये दोस्ती संघ. संघ मालक शरद शिरोडकर व अभय भिसे सावंतवाडी. आयकॉन खेळाडू आशिष शिरोडकर आणि अनिल जाधव. दुसरा संघ आहे कुडाळेश्वर अकॅडमी. या संघाचे संघ मालक आहेत दीपक कुडाळकर आणि याचे आयकॉन खेळाडू आहेत किरण परब व गोपाळ वेंगुर्लेकर, तिसरा संघ आहे महेश व पप्पू इलेव्हन. याचे मालक आहेत महेश कांदळगावकर आणि पप्पू परब मालवण. याचे आयकॉन खेळाडू आहेत रिजवान शेख आणि सागर किनळेकर. चौथा संघ आहे वासंती चॅरिटेबल ट्रस्ट. या संघाचे संघ मालक आहेत दत्त मिठबावकर देवगड. राहुल रेगे व तमास अल्मेडा हे आयकॉन खेळाडू आहेत. पाचवा संघ स्वामी समर्थ. याचे मालक आहेत बबली वायंगणकर आणि यशवंत किनळेकर. आयकॉन खेळाडू आहेत राजू पेंडुरकर व शाबिद तुळसकर. सहावा संघ वेंगुर्ला वायफर्स संघमालक राजन गिरप, आयकॉन खेळाडूसमीर आगा व संतोष कवीटकर, सातवा संघ मालक इलेव्हन. याचे मालक आहेत दीपक मयेकर. आयकॉन खेळाडू संदेश मसुरकर व विजय गोसावी. व्यापारी संघाचे या संघाचे नितीन वाळके सुद्धा सहभागी आहेत. आठवा संघ गंधार स्पोर्ट्स. मालक सत्यवान राणे कणकवली.आयकॉन खेळाडू दर्शन नार्वेकर व अण्णा चव्हाण, नववा संघ राजश्री इलेव्हन. संघाच्या मालक सौ. राजश्री लोके पवार देवगड. आयकॉन खेळाडू चंदन घाडी व वासू वरवडेकर. दहावा संघ संघर्ष इलेव्हन. मालक अनिल हळदीवे. आयकॉन खेळाडू सलीम शहा व सचिन तळाशीलकर. अकरावा संघ समर्थ वॉरियर्स. संघमालक प्रवीण मांजरेकर कुडाळ. आयकॉन खेळाडू नाना कुडाळकर व अनिल हडळ. बारावा संघ साई समर्थ स्पोर्ट्स. मालक साई ओटवकर कणकवली. आयकॉन खेळाडू प्रवीण कळसेकर व संजय दळवी.
या 12 संघांमध्ये संपूर्ण जिल्ह्यातील 13 आणि 14 खेळाडू विभागले गेलेले आहेत.यावर्षी आमच्या सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशन मध्ये दोडामार्ग तालुका सुद्धा सहभागी झाला आहे. यापूर्वी वैभववाडी आणि दोडामार्ग तालुके सहभागी नव्हते पण आता दोडामार्ग तालुका सहभागी झाला आहे. त्यामुळे दोडामार्गचे खेळाडू सुद्धा या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. एक आणि दोन मार्च रोजी कुडाळच्या तहसील ऑफिस नजीकच्या मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. पहिल्या दिवशी सामने हे साखळी पद्धतीने होतील दुसऱ्या दिवशी बाद पद्धतीने खेळले जातील.
विजेते संघासाठी रोख ११ हजार १११ आणि चषक देण्यात येईल हे पारितोषिक फ्रेंडशिप चेंदवण संघाचे मालक देवेंद्र नाईक यांनी पुरस्कृत केले त्याच बरोबर राकेश म्हाडदळकर हे सुद्धा पुरस्कर्ते आहेत. उपविजेत्या संघाला ७ हजार ७७७ दआणि चषक देण्यात येईल. लक्ष्मी ज्वेलर्सचे राजू पाटणकर यांनी हे बक्षीस पुरस्कृत केले आहे.तसेच मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज यासारखी जी वैयक्तिक पारितोषिके आहेत ती जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यांनी पुरस्कृत केलेली आहेत.
या स्पर्धेच्या निमित्ताने कुडाळच्या क्रीडा क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी योगदान दिले अशा लोकांचा सत्कार केला जाणार आहे. रविवारी बक्षीस वितरणाच्या दिवशी हा सत्कार होणार आहे. यामध्ये नंदू गावडे, दिलीप वर्दे, अरविंद शिरसाट, का आ सामंत, विद्याधर वेतुरेकर, रणजीत राणे, महेश कुडाळकर, भाई पाटकर, बच्चू सरमळकर, विजय प्रभू, सोनू ओटवणेकर, प्रसाद अणावकर याना शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. एक मार्चला सकाळी नऊ वाजता ही स्पर्धा सुरू होणार आहे, असंही माहिती काका कुडाळकर यांनी दिली.
