शिवा नायक खून प्रकरणी तीन संशयितांच्या मुसक्या आवळल्या…

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने घेतले ताब्यात:सर्व बाजूनी तपास होणार ; पोलिसांची माहिती..

⚡कुडाळ ता.१६-: कुडाळ शहरातील भाजी विक्रेता विक्रेता शिवा उर्फ शिवाप्पा कृष्णप्पा नायक (३०) याच्या हत्या प्रकरणी फरार असलेले सिताराम बाबू राठोड (वय 30), अजित अशोक चव्हाण (२१), आदिक अशोक चव्हाण (१९) यांना आज स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने बांदा येथे शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना कुडाळ पोलिसात आणण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान या प्रकरणी सर्व बाजूनी तपास केला जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
कुडाळ शहर बाजारपेठेत मारुती मंदिर नजीक राहणारा भाजीविक्रेता शिवाप्पा कृष्णाप्पा नायक (३०) याच्या आत्महत्या प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळाली होती. त्याची ती आत्महत्या नसून अनैतिक संबंधातून घातपात झाल्याचे कुडाळ पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्याच्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने कट रुचून पती शिवा याचा खून केला तसेच त्याने गळफास लावून घेतल्याचा बनाव करून खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. याबाबत व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपने पोलीस तपासाला बळकटी मिळाली होती. याप्रकरणी शिवा याची पत्नी सुनंदा उर्फ सोनाली शिवाप्पा नायक (२५) व तिचा प्रियकर सिताराम बाबू राठोड (३०) या दोघांसह अजित अशोक चव्हाण (२१) आणि आदिक अशोक चव्हाण (१९) (सर्व मूळ राहणार काळगीतांडा, विजापूर कर्नाटक आणि सध्या राहणार कुडाळ) या चौघांवर मिळून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यातील पत्नी सुनंदा हिला ताब्यात घेत अटक करण्यात आली होती. याबाबतची फिर्याद कुडाळ पोलीस ठाण्याचे हवालदार सचिन गवस यांनी दिली
शिवा नायक मूळ काळगीतांडा, विजापूर कर्नाटक येथील असून तो बरीच वर्षे कुडाळ बाजारपेठेत भाजी विक्रीचा व्यवसाय करायचा. तो आपल्या कुटुंबासह बाजारपेठेतील मारुती मंदिर नजीक राजेश पडते यांच्या चाळीत भाड्याने राहायचा. २५ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १२.३० वाजल्यानंतर शिवा याने तो राहत असलेल्या खोलीच्या स्वयंपाक खोलीत लोखंडीबाराला साडीने गळफास लावून घेत आत्महत्या केली, अशी खबर त्याची बहीण सीता शंकर राठोड (राहणार कुडाळ आंबेडकर नगर) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली होती. त्याची पत्नी व दोन मुले घरात झोपलेली असताना त्याने आत्महत्या केली. पत्नी मध्यरात्री दोन वाजता उठून स्वयंपाक खोलीत गेल्यानंतर तो गळफास लावलेल्या स्थितीत दिसला. यानंतर तिने शेजारील व्यक्तींना माहिती दिली. असे या खबरीत म्हटले होते.
या घटनेबाबत कुडाळ शहरात उलट सुलट चर्चा होती. हा घातपात झाल्याचे दबक्या आवाजात बोलले जात होते. ४ जानेवारी रोजी शिवा याचा भाऊ अशोक नायक व अन्य नातेवाईकांनी शिवा याचा घातपात झाला असून काही जणांवर संशय व्यक्त करून चौकशी करण्याबाबत तक्रार अर्ज दिला होता. याच दरम्यान सुनंदा हिची एका व्यक्तीसोबत झालेल्या चर्चेची एक ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती लागली. मात्र ही क्लिप त्यांच्या वंजारी भाषेत असल्याने पोलिसांना तपास कामात अडथळा येऊ लागला. पोलिसांनी संबंधित भाषेच्या दोन जाणकारांची मदत घेतली आणि ते भाषांतर ऐकल्यानंतर पोलिसांना ठोस पुरावाच मिळाला.
सुनंदा हिला ताब्यात घेण्यासाठी तिच्या मूळ गावी कुडाळ पोलीसांचे पथक रवाना झाले. तिथे जाऊन तिला ताब्यात घेतेवेळी त्या ठिकाणीच्या तिच्या समाजातील काही लोकांनी तिला ताब्यात देण्यास विरोध केला. मात्र पोलिसांनी सोमवारी रात्री तिला तिथून कुडाळ पोलीस ठाण्यात आणले आणि चौकशी सुरू केली.
शिवा याची पत्नी सुनंदा आणि सीताराम राठोड या दोघांचे अनैतिक संबंध आहेत त्यांच्या अनैतिक संबंधात शिवा हा अडथळा येत असल्याने सुनंदा उर्फ सोनाली व तिचा प्रियकर सिताराम यांनी कट रचून आपल्या अनैतिक संबंधातील काटा बाजूला करताना त्याचा खून केला. या कटात संशयित सीताराम याचे भाचे अजित अशोक चव्हाण (२१) व आदिक अशोक चव्हाण (१९) या दोघांना मदतीला घेतले होते. शिवा याचा खून केल्यानंतर चारही संशयित आणि त्याने राहत्या घरी गळफास घेतल्याचा बनाव करून खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी सुनंदा नायक हिच्यासह सीताराम राठोड, अजित चव्हाण व आदिक चव्हाण यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), २३८, ६२ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान सुनंदा हिला सोमवारी अटक करून मंगळवारी तिला कुडाळ न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी जी एक कुलकर्णी यांनी तिला एक दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा दिली होती. तिच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपल्याने तिला आज कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर तिची आज सावंतवाडी कारागृहात परवानगी करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास पोलीस पुन्हा तिच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत, अशी माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.

फरार संशयित बांद्यात सापडले

गुन्हा दाखल झाल्या पासून संशयित आरोपी सुनंदाचा प्रियकर सीताराम राठोड आणि त्याचे दोन भाचे अजित चव्हाण आणि आदिक चव्हाण हे फरार झाले होते. त्यांनी आपापले मोबाईल सुद्धा बंद करून ठेवले होते. त्यामुळे त्यांच्या तपासात अडथळे येत होते. तरी देखील ते नक्की सापडतील असा विश्वास पोलिसांना होता. कुडाळ पोलिसांसोबत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक सुद्धा त्यांच्या शोधात होते. त्यांना मिळालेल्या माहिती नुसार ते संशयित बांदा भागात एका वाहनाने येत असल्याचे समजले. त्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर सावंत, सहा.पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हवालदार आशिष गंगावणे, सदानंद राणे, प्रमोद काळसेकर, अमित तेली यांनी वाहनातून बांद्याच्या दिशेने चालत येणाऱ्या या तिघाही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांना कुडाळ पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्या वर गुन्हा दाखल कर्णयची प्रक्रिया सुरु होती. त्यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती तापसिक अधिकारी राजेंद्र मगदूम यांनी दिली.
दरम्यान या गुन्ह्याचा सर्व बाजूनी तपास असून अजून कोणाचा यात सहभाग आहे का याचा देखील शोध घेतला जाणार असल्याचे श्री. मगदूम यांनी सांगितले.

You cannot copy content of this page