श्रेया चांदरकर हिने शिल्पाकृतीतून सागरी प्रदूषणावर वेधले लक्ष…

⚡मालवण ता.११-:
भोपाळ मध्यप्रदेश येथे दि. २ ते ७ जानेवारी या कालावधीत पार पडलेल्या राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी श्रेया समीर चांदरकर हिने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत दृश्यकला प्रकारात सागरी जलप्रदूषण या विषयावर आधारित त्रिमित शिल्प तयार केले. सध्या गंभीर बनत चाललेल्या जलप्रदूषणावर कलेच्या माध्यमातून लक्ष वेधल्याबद्दल श्रेया हिच्या या शिल्पाचे सर्वांकडून कौतुक झाले.

जगभरात प्लास्टिक व इतर कचऱ्यामुळे होणाऱ्या जलप्रदूषणाचा जीवसृष्टीला फटका बसत आहे. पृथ्वीच्या ७१ टक्के भूभाग पाण्याने व्यापला असून महासागरांमध्ये प्लास्टिकमुळे तसेच जहाजांमधील तेलगळतीने होणाऱ्या प्रदूषणामुळे प्रचंड नुकसान होत आहे. या प्रदूषणामुळे अनेक सागरी जीव नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. महासागरात होणाऱ्या या प्रदूषणाचे गांभीर्य दर्शवीणारे त्रिमित शिल्प श्रेया हिने साकारले, यात समुद्र मातेच्या हातामध्ये प्लास्टिक बॉटलमध्ये अडकलेला मासा, टायरमध्ये अडकलेला ऑलिव्ह रीडले कासव, जहाजांमुळे होणारे प्रदूषण अशी सुंदर मांडणी केली असून समुद्र मातेच्या चेहऱ्यावरील करुण भाव शिल्प पाहणाऱ्याला अंतर्मुख करीत होते.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात स्वच्छता अभियान राबविले जात असून स्वच्छता हीच सेवा या उपक्रमांतर्गत सागरी किनारे स्वच्छ करण्याची मोहीम राबवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व शालेय विद्यार्थ्यांचे स्वच्छता संदेश देणारे कटआउट लावून या अभियानातील सकारात्मक बाजू मांडण्याचा प्रयत्न श्रेया हिने आपल्या कलाकृतीतून केलेला आहे. या विद्यार्थिनीला कलाशिक्षक श्री. समीर अशोक चांदरकर यांनी मार्गदर्शन केले. श्रेयाच्या या यशाबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त- कर्नल (सेवानिवृत्त )शिवानंद वराडकर, ऍड.एस.एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनिल नाईक, विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रविंद्रनाथ पावसकर, सर्व संचालक ,शालेय समिती अध्यक्ष सुधिर वराडकर, वराडकर हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page