राष्ट्रीय बँकांशी स्पर्धा करण्यासाठी आमचा पुढाकार…

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी:पुणे जिल्हा बँकेच्या शिष्टमंडळाने दिली जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाला भेट..

ओरोस ता १६
आपल्यापुढे खूप स्पर्धा आहेत. सद्य परिस्थितीत राष्ट्रीयकृत बँका ज्या पद्धतीने ग्राहकांच्या दरवाजात उभ्या राहतात. त्यांच्याच दरवाजात पूर्वी ग्राहक उभा रहात होता. अशा स्पर्धायुगात आपण मागे राहून चालणार नाही. यात आपणही पुढाकार घेतला पाहिजे. म्हणून आम्ही डोअर स्टेप बँकिंगचा पहिला प्रयोग सुरू केलाय. बँक सखींची नियुक्ती केली आहे. सर्वसामान्य ग्राहकांना तसेच जेष्ठ नागरिकांना बँकेची घरपोच सेवा दिली जात आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी बँकेच्या सिंधुदुर्गनगरी येथील प्रधान कार्यालयाच्या सभागृहात पूणे जिल्हा बँकेच्या संचालक यांच्या समोर केले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील काशिनाथ चांदेरे तसेच संचालक मंडळ यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयास सिंधुदुर्ग जिल्हा अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने सोमवारी भेट दिली. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सर्वश्री रेवणनाथ दारवटकर, ज्ञानोबा दाभाडे, दत्तात्रय येळे, संभाजी होळकर, भालचंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, उपसरव्यस्थापक सुनिल खताळ, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक समीर सावंत, विद्याधर परब, नीता राणे व संदिप उर्फ बाबा परब तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे आणि बँकेचे सरव्यवस्थापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पूणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष, सर्व उपस्थित संचालक मंडळ, मुख्य कार्य अधिकारी या सर्वांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व गोमेय मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना अध्यक्ष दळवी यांनी, एक मॉडेल म्हणून आम्ही पुढे येतोय. बँकेची २००० कोटीची उलाढाल या तीन वर्षात वाढली आहे. ती पुढील दोन वर्षात दोन हजाराने वाढणार आहोत. एकुण ८००० कोटी व्यवसायाचा टप्पा आम्ही गाठणार आहोत. आमचा जिल्हा छोटा असला तरी आम्ही ज्या पद्धतीने विकासासाठी वेग घेतोय त्यात आम्ही नक्की यशस्वी होऊ. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला मानसन्मान मिळत आहे. जिल्हा बंकेचा चेअरमन म्हणून योग्य मार्गदर्शन त्यांच्याकडून केले जाते. ज्यांना हा महाराष्ट्र आपले कुटुंब वाटते किंवा सिंधुदुर्ग जिल्हा बँक म्हणून आम्हाला जी मदत ते करतात त्यांचा विसर आंम्हाला कधीच पडणार नाही. असा विश्वास व्यक्त केला. यावेळी मनिष दळवी यांनी अभ्यास दौऱ्यातील सदस्यांचे स्वागत करुन त्यांना बँकेच्या विविध योजना तसेच बँकेच्या प्रगतीची माहिती दिली.

You cannot copy content of this page