मळा भागात नागरिकांनी जाळले होते टायर आणि प्लास्टिक फायबर
मालवण दि प्रतिनिधी मालवण शहरातील भरड रेवतळे परिसरात शुक्रवारी सकाळी आकाशात धुराचे लोट पसरल्याचे दिसून आले. मोठ्याप्रमाणात धूर पाहता नेमकी आग लागली कुठे याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. काही नागरिकांनी धुराच्या दिशेने धाव घेत नक्की कशामुळे एवढे धुराचे लोट पसरले आहेत हे त्या ठिकाणी जाऊन पाहिले. दरम्यान, मळा भागात नागरिकांनी टायर व अन्य प्लॅस्टिक फायबर जाळल्याने त्या आगीचे लोट पसरल्याचे स्पष्ट झाले. यावेळी पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर, वाहतूक पोलीस गुरुदास परब, पोलीस कर्मचारी ढोले, खोत, होमगार्ड जॉयल फर्नांडिस, पेंडूरकर, नगरपालिका कर्मचारी मिथुन शिगले आदी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी याबाबत संबंधितांना विचारणा केली असता पुन्हा अशा प्रकारची कृती घडणार नाही असे सांगितले.
