वैभव नाईक यांचे खुले आव्हान: राणे विरोधी पक्षात असताना स्वतःच्या स्वार्थासाठी कोणकोणत्या मुख्यमंत्र्यांना भेटले हे मी सिद्ध करेन..
मालवण (प्रतिनिधी)
गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी भेटल्याचे नारायण राणे यांनी पुराव्यानिशी सिद्ध केल्यास मी राजकारण सोडेन, असे खुले आव्हान मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांनी मालवण येथील पत्रकार परिषदेत बोलताना दिले.
मालवण येथील ठाकरे शिवसेना कार्यालयात आम. वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेस तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक नितीन वाळके, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, दीपा शिंदे, पूनम चव्हाण, बाबी जोगी, तपस्वी मयेकर, उमेश मांजरेकर, सुहास वालावलकर, महेश जावकर, किशोर गावकर, नीनाक्षी शिंदे, अक्षय रेवंडकर, नंदा सारंग, नरेश हुले, राजू परब, अन्वय प्रभू, राका रोगे, हेमंत मोंडकर, सिद्धेश मांजरेकर, यशवंत गावकर, उमेश चव्हाण, गणपत आडीवरेकर, मनोज मोंडकर, महेंद्र म्हाडगुत, स्वप्नील आचरेकर, तेजस लुडबे, बाबू वाघ, प्रविण रेवंडकर, भाग्यश्री लाकडे, किस्तू फर्नांडिस, गणेश कुडाळकर आदी उपस्थित होते.
यावेळी आम. वैभव नाईक म्हणाले, आता विधानसभेची निवडणूक होत आहे, परंतु मी अडीज वर्षे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत निष्ठावंत म्हणून राहिलेलो आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात जी विकास कामे मंजूर होती, त्या विकास कामांना नवीन शिंदे सरकारने स्टे लावला होता. या सरकारने स्टे उठवावा, यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर विकासकामांवरील स्टे उठवावा यासाठी दोन तीन वेळा मी भेटलो, मात्र दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांनी त्यात राजकारण करून स्टे उठवला नाही. परंतु अलीकडच्या काळात राणे यांचे सुपुत्र ज्या विकासकामांची उदघाटने करतायत आणि भाजपचे काही पदाधिकारी त्या कामांचे श्रेय घेत होते, ती विकासकामे असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी मंजूर करून घेतली होती. त्या कामांचा स्टे शिंदे सरकारने न उठवता, सर्वोच्च न्यायालयातून आम्ही उठवीला, त्याची ऑर्डरही आमच्याकडे आहे. आता निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मुख्यमंत्री जेव्हा सिंधुदुर्गात येतील तेव्हा आमचे मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे कि त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वैभव नाईक मला गेल्या दोन वर्षात भेटले असे जे नारायण राणे सांगत आहेत, त्याविषयी भूमिका स्पष्ट करावी असे आव्हानही नाईक यांनी दिले.
आम. नाईक पुढे म्हणाले, नारायण राणे विरोधी पक्षात असताना स्वतःच्या स्वार्थासाठी किती वेळा आणि कोण कोणत्या मुख्यमंत्र्यांना भेटले हे मी सिद्ध करेन, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना राणे हे काँग्रेस मध्ये होते. त्यांनी आपल्यावरील इडीची कारवाई टळावी यासाठी त्यावेळी गुजरातमध्ये अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांना राणे भेटले होते याचे व्हिडीओही त्यावेळी व्हायरल झाले होते. तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना राणे यांनी आपल्या मेडिकल कॉलेजच्या परवानगीसाठी उद्धव ठाकरे यांना फोन केले होते असा घणाघाती आरोपही नाईक यांनी करीत आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या मुलाला म्हणजेच निलेश राणे यांना उमेदवारी मिळावी म्हणून गेले सहा महिने ते भेटत होते असा गौफ्यस्फ़ोटही नाईक यांनी केला.
माझ्या कामावर प्रेरीत होऊन अनेक राणे समर्थक, भाजप कार्यकर्ते, शिंदे शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते आज ठाकरे सेनेत प्रवेश करत आहेत. या कार्यकर्त्यांबद्दल बोलताना राणे कोण समर्थक आपण ओळखत नाही, अशा भाषेत राणे बोलत आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना राणेंकडे काहीच किंमत नसते, या उलट ठाकरे सेनेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान केला जातो, हाच सर्वसामान्य कार्यकर्ता या निवडणुकीत माझ्या विजयासाठी मेहनत घेत आहे. मला माझ्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे, अशा शब्दात वैभव नाईक यांनी राणेंच्या टिकेला उत्तर दिले.
