जलजीवन मिशनचे ६४ टक्के जिल्ह्यात काम…

जलव्यवस्थापन सभेत कार्यकारी अभियंता पाताडे यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी-: जल जीवन मिशन योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ लाख २१ हजार २५६ कुटुंबांना नळ जोडणी पूर्ण करण्यात आली आहे .आतापर्यंत ६४.०७ टक्के नळ जोडणीचे काम पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांनी जलव्यवस्थापन समिती सभेत दिली. जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील बॅरिस्टर नाथ पै समिती सभागृहाततून ऑनलाइन संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जिल्हा परिषद पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, महिला व बालकल्याण सभापती शर्वरी गावकर, विषय समिती सभापती डॉ. अनिषा दळवी, महेंद्र चव्हाण ,समिती सदस्य श्वेता कोरगावकर, आदींसह खातेप्रमुख ऑनलाइन सहभागी झाले होते. आजच्या जलव्यवस्थापन समिती सभेत जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत आढावा देताना कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ एप्रिल दोन २०२० पर्यंत १ लाख ८१ हजार २७० उद्दिष्ट पैकी ७० हजार ७६३ कुटुंबांना नळ जोडणी करण्यात आली आहे तर सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात १ लाख १८ हजार ५०७ उद्दिष्ट पैकी ५० हजार ४९३ कुटुंबांना नळजोडणी करण्यात आली आहे. अशाप्रकारे २०१९- २० व २०२०-२१ मध्ये १ लाख २१ हजार २५६ कुटुंबांना नळ जोडणी करून आतापर्यंत ६४.०७ टक्के काम पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांनी सभेत दिली. देवगड आणि विजयदुर्ग प्रादेशिक नळपाणी योजनेतील लाभार्थी असलेल्या दहा ग्रामपंचायतींनी अद्याप पाणीपट्टी भरलेली नाही याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले असता ज्या ग्रामपंचायतीने अद्याप पाणीपट्टी भरली नाही अशा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक आणि सरपंच यांना निमंत्रित करून बैठकीचे आयोजन करा. अद्याप पाणीपट्टी का भरली नाही याची माहिती घ्या. त्यानंतरही पाणीपट्टी भरत नसतील तर संबंधित गावांचा पाणीपुरवठा बंद करा. असे आदेश अध्यक्ष संजना सावंत यांनी सभेत दिले. माटणे येथील तलावाच्या सुशोभीकरणासाठी ५० लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून कोणत्या स्वरूपाचे काम करण्यात येणार आहे. याची सविस्तर माहिती सभागृहात सादर करा. अशी सूचना समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी जलव्यवस्थापन समिती सभेत केली.

You cannot copy content of this page