*75 हजारांच्या दारुसह 2 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त_
कणकवली : गोव्याहून तळेरे च्या दिशेने होणारी गोवा बनावटीची होणारी दारू वाहतूक थरारक पाठलाग करून कणकवली पोलिसांनी पकडली. ए एस आय बापू खरात , कासार्डे आऊटपोस्ट इंचार्ज पोलीस नाईक रमेश नारनवर, पोलीस नाईक नितीन खाडये, कॉन्स्टेबल रुपेश गुरव यांच्या पथकाने ही कारवाई 14 एप्रिल रोजी रात्री पावणे नऊ वाजता कासार्डे पेट्रोल पंपानजिक नॅशनल हायवेवर केली. गोवा बनावटीच्या अवैध दारूची वाहतूक तळेरे च्या दिशेने होणार असल्याची टीप ए एस आय बापू खरात याना मिळाली होती. त्यानुसार खरात यांनी कासार्डे आऊटपोस्ट चे रमेश नारनवर, खाडये याना अलर्ट केले होते. नारनवर व खाडये कासार्डे पेट्रोल पंपानजीक थांबले होते.तर ए एस आय बापू खरात आणि कॉन्स्टेबल रुपेश गुरव हे खाजगी वाहनातून नांदगाव येथे थांबले होते. संशयित स्विफ्ट कार दिसताच खरात व गुरव यांनी स्विफ्ट कारचा पाठलाग सूरु केला. मात्र भरधाव वेगाने स्विफ्ट कार तळेरे च्या दिशेने निघून गेली. तात्काळ खरात यांनी मोबाईलवर नारनवर यांना संपर्क साधून संशयित कारचा तपशील दिला. त्यानुसार रमेश नारनवर व खाडये यांनी संशयित स्विफ्ट कार क्र. MH 01 V A 1998 ला अडवली. त्याचवेळी कारचा पाठलाग करणारे ए एस आय बापू खरात , रुपेश गुरव घटनास्थळी पोचले.कारमध्ये 75 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू सापडली. कारचालक यतीन उर्फ शुभम शरद डीचोलकर रा.आंबेरी ता मालवण याला ताब्यात घेतले असून 1 लाख 15 हजारांच्या दारुसह 1 लाख 50 हजारांची स्विफ्ट कार असा 2 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रमेश नारनवर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
