आठवडा बाजार बंद तरीही पाडवा खरेदीसाठी गर्दी…

मालवणची स्थिती

*💫मालवण दि.१२-:* दोन दिवसीय विकेंड लॉकडाऊन नंतर आज सोमवारी मालवणच्या बाजारपेठेत नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मालवणचा सोमवारचा आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला असला तरी गुढीपाडवा सण आणि कडक लॉकडाऊनची भीती यामुळे नागरिकांनी विविध जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. कडक निर्बंधांच्या विरोधात असणाऱ्या व्यापाऱ्यांनीही सर्व प्रकारची दुकाने आज उघडली होती. तर काही तुरळक प्रमाणात पर्यटकही मालवणात दाखल झाले होते. राज्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कडक निर्बंध आणि विकेंड लॉकडाऊन लागू केले आहे. शनिवार आणि रविवार या विकेंड लॉकडाऊनच्या दोन्ही दिवशी मालवणच्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे दोन दिवस मालवणात शुकशुकाट होता. मात्र लॉकडाऊन संपल्यानंतर आज सोमवारी नागरिक बाहेर पडले. राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याबाबत शासन दरबारी हालचाली सुरू असल्याने भीतीच्या छायेखाली असणाऱ्या नागरिकांनी आज बाहेर पडत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली. कडक निर्बंधांमध्ये केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचा नियम व्यापाऱ्यांना मान्य नसल्याने या विरोधात जिल्हा व्यापारी महासंघाने आज सर्व प्रकारची दुकाने सुरू करणार असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आज मालवण बाजारपेठेतील सर्व दुकाने उघडण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांनी खरेदी साठी गर्दी केली. तसेच उद्या गुढीपाडवा सण असल्याने त्यादृष्टीनेही नागरिकांनी खरेदी केली. दोन दिवसीय लॉकडाऊन संपल्यानंतर मालवणात गोवा येथून काही पर्यटकांच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. यामुळे मालवणातील जलक्रीडा व्यवसाय सुरू ठेवण्यात आला होता. पर्यटकांनी जलक्रीडांचा आनंद लुटला. तर सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक सुरू होती. मात्र पर्यटकांची संख्या तुरळक असल्याने फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

You cannot copy content of this page