कणकवली पोलिसांची अवैद्य दारू विरोधात धड़क कारवाई…

सुमारे ९ लाखाची पकडली दारू; शनिवारी मध्यरात्री केली मोठी कारवाई

*💫कणकवली दि.११-:* गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकमधून तब्बल 8 लाख 89 हजार 200 रुपयांची गोवा बनावटीची अवैध दारू कणकवली पोलिसांनी पकडली. 7 लाखाच्या ट्रकसह एकूण 15 लाख 89 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कौतुकास्पद कामगिरी कणकवली पोलिसांनी 11 एप्रिल रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास नॅशनल हायवेवर ओसरगाव टोलनाक्याजवळ केली. गोव्याहून अवैध दारू वाहतुक होणार असल्याची टीप मिळाल्यानुसार पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली ए एस आय सावंत,चालक ए एस आय उबाळे पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे, होमगार्ड पवार यांचे पथक ओसरगाव येथे गस्त घालत होते. ओसरगाव टोलनाक्याजवळ आयशर ट्रक क्र.GJ -06 -X -7898 ला थांबवून ट्रकमध्ये काय आहे ते दाखवण्यासाठी सांगितले असता चालक आणि त्याच्या सोबतच्या अन्य एकाने ट्रक ची चावी घेऊन अंधारात पळ काढला. पोलिसांनी ट्रक च्या हौद्यात पाहिले असता गोवा बनावटीची दारू आढळून आली. याबाबत कॉन्स्टेबल बनसोडे यांनी ए एस आय बापू खरात याना कळवले असता बापू खरात व कॉन्स्टेबल रुपेश गुरव घटनास्थळी पोचले. त्यानंतर खाजगी मॅकेनिक रोहित गावडे याच्याकडून ट्रक सुरू करून घेऊन कणकवली पोलीस ठाण्याच्या आवारात आणून ठेवला. पंचांसमक्ष ट्रकमधील दारूची मोजदाद केली असता एकूण 8 लाख 89 हजार 200 रुपयांची अवैध दारू आढळून आली.सदर दारुसह 7 लाख रुपये किंमतीचा ट्रक जप्त करण्यात आला असून कॉन्स्टेबल बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page