जिल्हा बँकेची गणेशोत्सवासाठी दुर्वांकुर विशेष मुदत ठेव योजना…

आज झाला प्रारंभ:अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती..

ओरोस ता.१९-:

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आगामी गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर 21 महिने कालावधीची 8.20 टक्के विशेष व्याजदर देणारी दुर्वांकुर विशेष मुदत ठेव योजना आणली आहे. या योजनेचा शुभारंभ 19 ऑगस्ट 2024 पासून झालेला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
याबाबत माहिती देण्यासाठी सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालय सभागृहात अध्यक्ष दळवी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक महेश सारंग, अकाउंट विभागाचे जनरल मॅनेजर दिवाकर देसाई आदी उपस्थित होते. यावेळी दळवी यांनी, गतवर्षी मंगलमूर्ती ठेव योजना गणेशोत्सव कालावधीत राबविली होती. त्यावेळी ११२ कोटी ठेवी आल्या होत्या, असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना दळवी यांनी, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा बँकांत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने आपले नावलौकिक राखले आहे. आपली बँक ठेवीदारांना त्यांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या ठेव योजना राबवित असते. डिजिटल बँकिंगची गरज ओळखून बँक राष्ट्रीयकृत, खाजगी बँकांच्या समकक्ष योजना राबवित आहे. बँकेचे ठेवीदार ग्राहक, सभासद सहकारी संस्था व समस्त जिल्हा वासीयांच्या बँकेवरील अतूट विश्वासामुळे बँकेच्या ठेवीमध्ये उत्तरोत्तर वाढ होत आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात बँकेने ठेवीच्या उद्दिष्टांच्या १०२.५१ टक्के पूर्तता केली होती. २०२४-२५ मधील येवू घातलेल्या गणेशोत्सव कालावधीसाठी जिल्हा बँकेने २१ महिने मुदतीची ८.२० टक्के व्याजदर देणारी दुर्वांकुर विशेष मुदत ठेव योजना आणली आहे. त्याची सुरुवात आजपासून झाली असून या योजनेसाठी अन्य बँकांच्या तुलनेत जिल्हा बँक सर्वाधिक व्याजदर देत आहे, असे सांगितले. याचा जिल्ह्यातील नागरिक, चाकरमानी यांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन यावेळी अध्यक्ष दळवी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page