शिरोडा वेळागरवासीयांचे उपोषण स्थगित…

राजन तेली यांची यशस्वी शिष्टाई: ग्रामस्थांची लवकरच गिरीश महाजन यांच्या सोबत बैठक..

⚡सावंतवाडी ता.१६-: शिरोडा वेळागर येथील प्रस्तावित ताज हॉटेल प्रकल्पामुळे बाधित स्थानिक ग्रामस्थांनी काल स्वातंत्र्यदिनी मुंबई येथील आझाद मैदानावर तसेच शिरोडा वेळागर येथे पाण्यात उतरून उपोषण छेडले. या उपोषणाला भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांनी भेट देत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याशी कॉन्फरन्स कॉल द्वारे चर्चा घडवून आणली. या चर्चेतील सकारात्मक संवाद आणि ताज ग्रुप सोबत होणाऱ्या बैठकीच्या आश्वासनाअंती अखेर स्थानिकांनी उपोषण मागे घेतले.

शिरोडा वेळागर येथील ताज हॉटेल प्रकल्पामुळे स्थानिक ग्रामस्थांनी आपण बेघर होण्याची भीती व्यक्त केली होती. तसेच ज्या जागेत आमची राहती घरे व मंदिरे आहेत ती ९ हेक्टर जागा आम्हाला सोडावी व पर्यटन प्रकल्पामुळे होणाऱ्या ग्रामीण पर्यटनामध्ये आम्हाला सामावून घ्यावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. होऊ घातलेल्या पर्यटन प्रकल्पाला आमचा कोणताही विरोध नसून आमच्या मागण्या मान्य कराव्या, अशी मागणी ही त्यांनी केली होती.
त्या पार्श्वभूमीवर काल स्वातंत्र्यदिनी प्रकल्प
बाधित ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी आझाद मैदानावर उपोषण छेडले. तसेच स्थानिक महिला व मुले यांनी खाडीत उभे राहून उपोषणाला पाठिंबा देत या ठिकाणीही आंदोलन केले. या आंदोलनाला भेट देत माजी आमदार राजन तेली यांनी स्थानिकांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याशी वेळागर परिसरातील गावठण क्षेत्र ताज प्रकल्पातून वगळण्याबाबत कॉन्फरन्स कॉल द्वारे चर्चा केली आणि लवकरच उपोषणकर्ते ग्रामस्थ आणि ताज ग्रुप सोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. अखेर या चर्चेतील सकारात्मक संवाद आणि ताज ग्रुप सोबत होणाऱ्या बैठकीच्या आश्वासनाअंती अखेर स्थानिकांनी उपोषण मागे घेतले.

You cannot copy content of this page