Headlines

सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय बॉम्बने उडविण्याची धमकी…

धमकीच्या ई-मेलने खळबळ; न्यायालयासह विधी सेवा प्राधिकरणाचा परिसर केला रिकामा; बॉम्ब शोधक व श्वान पथकाकडून कसून तपासणी..

⚡ओरोस, ता. २-: सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात आयईडी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने सोमवारी (ता. २) न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. या धमकीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने संपूर्ण न्यायालयासह जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची इमारत रिकामी करून परिसर सील केला. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि श्वान पथकाच्या साहाय्याने न्यायालयाच्या इमारतीसह संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात आली. मात्र, तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा बॉम्ब आढळून न आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यानंतर कडक तपासणी करून न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि पक्षकारांना न्यायालयात प्रवेश देण्यात आला. यानंतर न्यायालयाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले.
सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात सोमवारी बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली. या ई-मेलमध्ये जिल्हा न्यायालयाबरोबरच मेट्रो स्थानकांवर रात्री ९ वाजून ११ मिनिटांनी बॉम्बस्फोट घडविण्याचाही उल्लेख आहे. तसेच १९८४ मधील रक्तपाताचा बदला रक्ताने घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या गायक दिलजीत दोसांझ यांच्या कार्यक्रमातही बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देण्यात आली आहे. यासाठी आयफोनमध्ये आयईडी ठेवण्यात येणार असल्याचा दावा ई-मेलमध्ये करण्यात आला आहे. या धमकीच्या मजकुरामुळे न्यायालय परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
धमकीचा ई-मेल प्राप्त होताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली. अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी पोलीस पथकासह जिल्हा न्यायालय परिसरात धाव घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयातील न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि पक्षकारांना इमारतीबाहेर काढण्यात आले. त्याचबरोबर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची इमारतही रिकामी करण्यात आली. संपूर्ण परिसरात प्रवेश रोखून पोलिसांनी तपासणी मोहीम हाती घेतली.
बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि श्वान पथकाने न्यायालयाच्या मोकळ्या आवारासह इमारतीचा पहिला मजला, स्वच्छतागृहे आणि अन्य भागांची कसून तपासणी केली. या तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा स्फोटके आढळून आली नाहीत. याबाबत पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल दिल्यानंतर न्यायालय परिसरातील तणाव काहीसा निवळला.

चौकट
अपर पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी धाव
धमकीच्या ई-मेलची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी न्यायालय परिसरात धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्या उपस्थितीत पोलीस यंत्रणेने संपूर्ण न्यायालय परिसर रिकामा केला. न्यायालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या इमारतीतील अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली.

चौकट
तपासणीनंतर सर्वांनी सोडला सुटकेचा निःश्वास!
धमकीच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. बॉम्ब शोधक व श्वान पथकाने इमारतीचा कानाकोपरा तपासला. मात्र, कोणतीही स्फोटके अथवा संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. तपासणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयातील न्यायाधीश, वकील, अधिकारी, कर्मचारी आणि पक्षकारांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

चौकट
तपासणी करूनच न्यायालयात प्रवेश
संपूर्ण परिसराची तपासणी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात पुन्हा प्रवेश देण्यास सुरुवात केली. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने कोणालाही थेट प्रवेश देण्यात आला नाही. न्यायाधीश, वकील, कर्मचारी तसेच न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या पक्षकारांची तपासणी करूनच त्यांना आत सोडण्यात आले. त्यानंतर न्यायालयाचे दैनंदिन कामकाज पुन्हा सुरू झाले.

फोटो ओळ:- सिंधुदुर्गनगरी:

You cannot copy content of this page