Headlines

‘एक आठवडा, सात कृती’तून पर्यावरण संवर्धनाचा जागर…

सिंधुदुर्गात ७ नोव्हेंबरपर्यंत शाश्वत जीवनशैली सप्ताह;ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाड्यांसह नागरिकांचा सहभाग..

⚡ओरोस, ता. २-: पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी केवळ मोठमोठ्या मोहिमा नव्हे, तर दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या सवयीही महत्त्वाच्या ठरतात. हाच संदेश घराघरांत पोहोचविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ‘ब्रिक्स शाश्वत जीवनशैली सप्ताह २०२६’ साजरा करण्यात येत आहे. ‘एक आठवडा, सात कृती, एक पृथ्वी’ या संकल्पनेवर आधारित या अभियानात पाणी व वीज बचत, प्लास्टिकमुक्ती, कचरा व्यवस्थापनासह पर्यावरण संवर्धनाच्या सात कृतींवर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाड्या, महिला बचत गट आणि युवक मंडळांच्या सहभागातून पर्यावरणपूरक जीवनशैलीची लोकचळवळ उभारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी या अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. मिशन LiFE (Lifestyle for Environment) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या सप्ताहात प्रत्येक दिवसासाठी स्वतंत्र पर्यावरणपूरक कृती निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये आरोग्यदायी जीवनशैली, ऊर्जा बचत, पाणी बचत, शाश्वत अन्नप्रणाली, एकल वापर प्लास्टिकला नकार, ई-कचरा कमी करणे आणि घनकचरा व्यवस्थापन या सात विषयांचा समावेश आहे.
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी १ नोव्हेंबरला आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी मिशन LiFE शपथ, योग, व्यायाम, प्रभात फेरी आणि वृक्षारोपणाचे उपक्रम नियोजित करण्यात आले होते. आज (ता. २) ऊर्जा बचतीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. उद्या (ता. ३) पाणी बचत, जलसंवर्धन आणि पारंपरिक जलस्रोतांच्या संरक्षणावर विशेष भर दिला जाणार आहे.
४ नोव्हेंबरला तृणधान्यांचा वापर वाढविणे, अन्नाची नासाडी टाळणे आणि ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याबाबत जनजागृती होणार आहे. ५ नोव्हेंबरला एकल वापर प्लास्टिकला नकार देत कापडी पिशव्यांच्या वापराला प्रोत्साहन दिले जाईल. ६ नोव्हेंबरला ई-कचरा संकलन आणि त्याच्या सुरक्षित विल्हेवाटीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. सप्ताहाची सांगता ७ नोव्हेंबरला परिसर स्वच्छता, ओला-सुका कचरा वर्गीकरण आणि ‘रिड्यूस, रियूज, रिसायकल’ या त्रिसूत्रीच्या जनजागृतीने होणार आहे.
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावर नियोजन करण्यात येत आहे. विविध शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट आणि युवक मंडळांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे.

पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाची!
‘पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. पाणी व वीज बचत करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे आणि स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे अशा छोट्या कृतींमधूनही पर्यावरण रक्षणाला मोठा हातभार लागू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभागी होऊन पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार करावा,’ असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page