महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार : प्रभाकर सावंत..

⚡वेंगुर्ला, ता. ३१-: महिलांना व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. वेंगुर्ल्यातील महिलांनी एकत्र येऊन ‘लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेशन’च्या माध्यमातून महिलांसाठी व्यावसायिक व्यासपीठ निर्माण केले आहे. हा स्तुत्य उपक्रम असून, अशा प्रकारचे उपक्रम प्रत्येक शहरात राबविले जावेत. या उपक्रमांना आपले नेहमीच सहकार्य राहील, असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले.
वेंगुर्ला येथे इनरव्हील क्लब आणि लक्ष्मी आधार फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गट, गृहउद्योजिका आणि नवउद्योजिकांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, गृहोपयोगी साहित्य, विविध उत्पादने तसेच खाद्यपदार्थांचे भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाला ३१ ऑक्टोबर रोजी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष पपू परब, वायंगणीचे उपसरपंच अनंत केळजी, भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी दीपक भगत, बाळा सावंत, लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेशनच्या अध्यक्षा ज्योती देसाई, सदस्य शुभदा नवार, दीपाली अभ्यंकर, काजल गिरप, इनरव्हील क्लबच्या ट्रेझरर वृंदा गवंडळकर, आरती गिरप, रसिका मठकर आदी उपस्थित होते. यावेळी इनरव्हील क्लब आणि लक्ष्मी आधार फाऊंडेशनच्या वतीने प्रभाकर सावंत, पपू परब, अनंत केळजी, दीपक भगत आणि बाळा सावंत यांचा सत्कार करण्यात आला. कोकणातील महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळावी, यासाठी मंत्रालयाच्या ठिकाणी महिलांना विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रभाकर सावंत यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसन्ना देसाई यांनी केले. फोटोओळ : वेंगुर्ला येथे इनरव्हील क्लब आणि लक्ष्मी आधार फाऊंडेशनच्या वतीने आयोजित भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भेट देऊन पाहणी केली.”
