Headlines

शिवरायांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी बांद्यात भव्य किल्ले स्पर्धा

श्री स्वराज्य प्रतिष्ठानचा उपक्रम; १० नोव्हेंबरपासून किल्ल्यांचे परीक्षण

बांदा/प्रतिनिधी
दिवाळीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास आणि महाराष्ट्राच्या गड-किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने श्री स्वराज्य प्रतिष्ठान, बांदा (सिंधुदुर्ग) यांच्या वतीने भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी 15 वर्षाखालील लहान गट आणि मोठा गट असे दोन स्वतंत्र गट ठेवण्यात आले आहेत. बालकांमध्ये ऐतिहासिक वारशाबद्दल आवड निर्माण व्हावी, किल्ले निर्मितीच्या माध्यमातून त्यांच्यातील सर्जनशीलता, कलात्मकता आणि कल्पकतेला वाव मिळावा, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ओळख अधिक दृढ व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
या स्पर्धेचे परीक्षण १० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. परीक्षक प्रत्यक्ष सहभागी स्पर्धकांच्या घरी किंवा त्यांनी उभारलेल्या ठिकाणी जाऊन किल्ल्यांची पाहणी करणार असून त्यानुसार परीक्षण केले जाणार आहे.
आजच्या डिजिटल युगात नव्या पिढीला आपल्या इतिहासाची आणि ऐतिहासिक वास्तूंची ओळख व्हावी, त्यांच्यामध्ये स्वराज्याच्या इतिहासाविषयी अभिमान आणि जिज्ञासा निर्माण व्हावी, या भावनेतून प्रतिष्ठानने हा उपक्रम हाती घेतला आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून बालचमूंना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, गड-किल्ल्यांच्या स्थापत्यकलेची आणि स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची प्रेरणा मिळणार आहे.

You cannot copy content of this page