Headlines

ज्येष्ठ नागरिक विचार मंचाच्या निवडणुकीत श्री देव बांदेश्वर आघाडीचे वर्चस्व

११ पैकी ११ जागांवर आघाडीच्या उमेदवारांची बाजी; निकिता मोरजकर यांना सर्वाधिक १५५ मते, ६३ टक्के मतदान

बांदा/प्रतिनिधी
बांदा येथील ज्येष्ठ नागरिक विचार मंच, बांदा पंचक्रोशीच्या ११ जागांसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत श्री देव बांदेश्वर आघाडीने सर्व ११ जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांनी सर्वसाधारण तसेच महिला राखीव गटात बाजी मारली. महिला गटातून निकिता मोरजकर यांनी १५५ मते मिळवत सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते मिळविण्याचा मान मिळवला. तर पुरुष गटात गुरुनाथ नार्वेकर आणि जगन्नाथ सातोस्कर यांनी प्रत्येकी १५४ मते मिळवली.
बांदा ग्रामपंचायतीच्या सभागृहात सकाळी ८ ते दुपारी १२.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण २९२ मतदारांपैकी १८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी ६३ टक्के इतकी राहिली. मतदानानंतर त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला.
पुरुषांच्या नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत श्री देव बांदेश्वर आघाडीकडून महादेव बांदेकर (१४१), हरिश्चंद्र भिसे (१४३), उत्तम देसाई (१४१), भिकाजी धुरी (१३६), हनुमंत मालवणकर (१४४), गुरुनाथ नार्वेकर (१५४), जगन्नाथ सातोस्कर (१५४), प्रकाश शिर्के (१४२) आणि महादेव वसकर (१४१) यांनी मते मिळवली. अपक्ष उमेदवारांमध्ये महादेव सावंत यांना ५९, सुकाजी गावडे यांना ४५ आणि अशोक परब यांना ३३ मते मिळाली.
महिला राखीव गटात निकिता मोरजकर यांनी १५५, तर अर्चना सावंत यांनी १४९ मते मिळवून विजय संपादन केला. अपक्ष उमेदवार अनुराधा मोर्ये यांना ३३ मते मिळाली. मतमोजणीदरम्यान सर्वसाधारण गटातील १७, तर महिला गटातील १२ मते बाद ठरली. निवडणुकीत श्री देव बांदेश्वर आघाडीच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळवल्याने मंचाच्या आगामी कार्यकारिणीत आघाडीचे वर्चस्व राहणार आहे. या निकालाकडे बांदा पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांचे लक्ष लागून होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पृथ्वीराज बांदेकर यांनी काम पाहिले.
फोटो:-
बांदा येथे ज्येष्ठ नागरिक विचार मंचच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना माजी अध्यक्ष अन्वर खान. (छायाचित्र- नीलेश मोरजकर)

You cannot copy content of this page