Headlines

“भाजपा श्री २०२६’च्या व्यासपीठावर विशाल परब यांच्या वक्तृत्वाची तुफानी बॅटिंग…

नऊ मिनिटांच्या भाषणाने हास्यकल्लोळ अन् टाळ्यांचा कडकडाट; विनोद राऊळ, ॲड. अनिल निरवडेकर यांच्यावरील मिश्कील भाष्याची रंगत..

⚡सावंतवाडी ता. ०२-: शरीरसौष्ठवाच्या मैदानात स्पर्धकांनी आपल्या पीळदार देहयष्टीचे सामर्थ्य दाखवत उपस्थितांची मने जिंकली; मात्र याच व्यासपीठावर आपल्या वक्तृत्वाने उपस्थितांना खिळवून ठेवण्याची बाजी युवा नेते विशाल परब यांनी मारली. भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने तसेच युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून जगन्नाथराव भोसले शिव उद्यानात आयोजित ‘भाजपा श्री २०२६’ शरीरसौष्ठव स्पर्धेच्या व्यासपीठावर त्यांनी तब्बल नऊ मिनिटे आपल्या खास शैलीत संवाद साधत उपस्थितांची दाद मिळविली.

सामान्यतः इतरांना अधिक बोलण्याची संधी देत अवघ्या दोन-तीन मिनिटांत मनोगत व्यक्त करणारे विशाल परब यावेळी मात्र तब्बल नऊ मिनिटे बोलले. आत्मविश्वासपूर्ण मांडणी, अचूक टायमिंग, मिश्कील शैली आणि राजकीय परिपक्वतेचा सुरेख मिलाफ त्यांच्या भाषणातून दिसून आला. वरिष्ठांचा आदर, सहकाऱ्यांचा सन्मान, शहराच्या विकासाची अपेक्षा आणि युवकांसाठी नवी व्यासपीठे उभारण्याची भूमिका त्यांनी मांडली.

‘एक घाव दोन तुकडे’ नव्हे, तब्बल ४५ तुकडे..

भाषणातील सर्वाधिक रंगतदार क्षण ठरला तो भाजपाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विनोद राऊळ यांच्या उल्लेखाचा. निवेदकांनी विनोद राऊळ यांची ‘गदर’ चित्रपटातील सनी देओल यांच्या भूमिकेशी तुलना करत ‘एक घाव दोन तुकडे’ असा उल्लेख केला होता. त्यावर विशाल परब यांनी मिश्कील शैलीत, “विनोद राऊळ साहेब म्हणजे एक घाव दोन तुकडे करणारे नव्हेत, तर तब्बल ४५ तुकडे करण्याची ताकद असलेले नेते आहेत. त्यांच्या आशीर्वादाचा आणि आमच्या पाठीवर असलेल्या हाताचा आधार आम्हाला भल्याभल्यांना समोरासमोर भिडण्याचे बळ देतो,” असे सांगितले. या विधानावर उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला आणि टाळ्यांच्या कडकडाटाने परिसर दुमदुमून गेला.

‘नायक’मधील अनिल कपूर नव्हे, विकास घडविणारे अनिल निरवडेकर..

यानंतर त्यांनी सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचाही आपल्या खास शैलीत उल्लेख केला. “‘नायक’ चित्रपटातील एका दिवसात मुख्यमंत्री बनलेल्या अनिल कपूरप्रमाणेच सावंतवाडी शहराचा चेहरामोहरा बदलण्याची संधी अनिल निरवडेकर यांच्यासमोर आहे. पुढील चार वर्षांत सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणारा विकास घडविण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. ते या संधीचे सोने करतील,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

चित्रपटातील संदर्भ, स्थानिक नेतृत्वाचा गौरव आणि शहराच्या विकासाच्या अपेक्षा यांची सांगड घालत विशाल परब यांनी उपस्थितांना आपल्या भाषणात गुंतवून ठेवले.

युवकांसाठी नवी व्यासपीठे उभारणार.

दोडामार्गातही बॉडी बिल्डिंग स्पर्धेचा मानस सिंधुदुर्गातील युवकांना त्यांच्या कला, क्रीडा, कौशल्य आणि सामर्थ्याला वाव मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याची भूमिका विशाल परब यांनी मांडली.

‘भाजपा श्री’ स्पर्धेमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षीही अशाच भव्य स्वरूपात शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्याचा मानस व्यक्त करतानाच आगामी काळात दोडामार्ग तालुक्यातही भव्य बॉडी बिल्डिंग स्पर्धा घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.”

You cannot copy content of this page