⚡मालवण ता.०१-:
मालवण नगरपालिकेच्या सुधारित नळपाणी योजनेच्या कामाबाबत विरोधक कोणताही माहिती न घेता नागरिकांमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम करत आहेत. या योजनेचे काम योग्य पद्धतीने सुरु असून कोणीही पाण्यासाठी वंचित राहणार नाही, त्यामुळे नागरिकांनी विरोधकांच्या आरोपांवरून नळपाणी योजेनेबाबत कोणतेही गैरसमज करून घेऊ नयेत, असे मालवण नगरपालिकेचे शिंदे शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मालवण नगरपालिकेतील सत्ताधारी शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगावकर यांनी नळपाणी योजनेविषयी माहिती दिली. यावेळी नगरध्यक्षा सौ. ममता वराडकर, उपनगरध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, नगरसेवक महेश कोयंडे, नगरसेविका मेघा सावंत, नीना मुंबरकर, अश्विनी कांदळकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहरप्रमुख राजु बिडये, मोहन वराडकर, रोहन आचरेकर आदी उपस्थित होते.
यावेळी महेश कांदळगावकर म्हणाले, सुधारित नळपाणी योजने बाबत विरोधकांकडून गैरसमज पसरविले जात आहेत. सदर नळपाणी योजना माझ्या नगराध्यक्ष पदाच्या काळात म्हणजेच २०१६ ते २०२१ या कालावधीत मंजूर झाली होती. योजनेसाठी प्रथमत: २८ कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली होती. निविदा ५० ते ६० टक्के वाढीव असल्याने शासनाने योजनेचे फेरमूल्यांकन करा व प्रस्ताव पाठवा असे सांगितले होते. या दरम्यान २०२१ मध्ये आमचा कार्यकाळ संपला. त्यानंतर २०२२ मध्ये नवीन निविदा काढण्यात आली. त्यावेळी नगरपालिकेवर प्रशासन कार्यरत होते तर तत्कालीन आमदार वैभव नाईक होते. मधल्या तीन वर्षाच्या काळात या योजनेची पुढील कोणतीही कार्यवाही झाली नाही. मात्र आमदार निलेश राणे हे निवडून आल्यावर लगेचच या योजनेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले, असेही महेश कांदळगावकर म्हणाले.
नळपाणी योजनेच्या राजकोट व रेवतळे येथील टाक्या कुंभारमाठ येथे हलविल्याचा गैरसमज विरोधक पसरवीत आहेत. मात्र २०२२ साली झालेल्या योजनेच्या प्रस्तावात राजकोटसाठी पाण्याची टाकी ही कुंभारमाठ येथेच दाखविण्यात आली होती. कुंभारमाठ येथून राजकोट पर्यंत थेट पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे राजकोट येथे कोणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही, असे कांदळगावकर यांनी सांगितले. तसेच रेवतळेसाठी रेवतळे येथेच टाकी होती, मात्र नवीन आराखड्यानुसार तेथील जमिनीत पाणी जास्त असल्याने, दलदल असल्याने तसेच ओहोटीची समस्या असल्याने तेथे टाकी उभारण्यास योग्य लेव्हल मिळत नसल्याने रेवतळे साठी कुंभारमाठ येथे टाकी उभारण्यात येणार आहेत. राजकोट व रेवतळे साठीच्या दोन्ही टाक्या कुंभारमाठ येथे उभारण्यात येणार आहेत, कुंभारमाठ हे उंचावर असल्याने चांगल्या ग्रॅव्हीटीने पाणी मिळणार आहे. हे काम पीएमसीच्या अभ्यासपूर्वक मार्गदर्शनाखालीच करण्यात येत आहे. त्यामुळे पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही, असे महेश कांदळगावकर यांनी स्पष्ट केले.
तसेच नळपाणी योजनेच्या कामावरील ठेकेदार व प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटन्सीच्या प्रमुख हे भाऊ- बहीण असल्यावरून विरोधक नाहक टीका करत आहेत. भाऊ – बहिणीने एकत्र काम करू नये असे कुठेही नाहीय. या कामासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटन्सी ही २०२२ सालीच नेमण्यात आली होती. त्यावेळी आम्ही नगरपालिकेत नव्हतो तसेच निलेश राणे देखील आमदार नव्हते. त्यावेळी प्रशासन व तत्कालीन आमदार वैभव नाईक काम करत होते. मग त्यावेळी त्यांना पीएमसी नेमताना भाऊ – बहिणीचा संबंध दिसला नाही काय ? असे कांदळगावकर यांनी सांगत विरोधकांनी उगाच कोणतेही तर्क लावून गैरसमज पसरवू नये, असेही सांगितले.
तसेच काही दिवसापूर्वी नळपाणी योजनेच्या कामाबाबत नगरपालिकेच्या विशेष सभेत जो ठराव केला गेला, तो ठराव म्हणजे अंतिम स्वरूप झाले नाही. हा ठराव शासनाकडे पाठवला असून तो मंत्रालयातील मुख्य अभियंत्याकडे जाणार असून त्यांच्याकडून अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. मालवणच्या जनतेने विरोधकांच्या आरोपावरून कोणतेही गैरसमज करून घेऊ नयेत, जनतेने आमदार निलेश राणे तसेच आम्हा नगरसेवकांवर जो विश्वास ठेवला आहे तो ढळू देऊ नये, असेही महेश कांदळगावकर यांनी सांगितले.

