वाघ पाणंद येथे लवकरच युरीनल सुविधा; नगराध्यक्षा सौ. श्रद्धा राजे भोसले यांच्या सूचनेनुसार नगरपरिषद प्रशासनाने घेतला निर्णय..

सावंतवाडी ता. २ : सावंतवाडी नगरपरिषद क्षेत्रातील फूल मार्केटमधील विक्रेत्यांची दीर्घकाळापासूनची मागणी लक्षात घेऊन नगरपरिषद प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. फूल मार्केट परिसरातील विक्रेत्यांची गैरसोय दूर करण्यासाठी तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता व आरोग्य अबाधित राखण्यासाठी वाघ पाणंद येथे लवकरच युरीनल सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नगराध्यक्षा सौ. श्रद्धा लखमराजे भोसले यांच्या सूचनेनुसार नगरपरिषद प्रशासनाने याबाबत निर्णय घेतला असून, आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. फूल मार्केटमध्ये दररोज व्यवसायासाठी येणाऱ्या विक्रेत्यांना स्वच्छतागृहाच्या सुविधेअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. वाघ पाणंद येथे युरीनल सुविधा उपलब्ध झाल्यानंतर विक्रेत्यांची ही गैरसोय दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. या सुविधेमुळे परिसरातील स्वच्छता राखण्यासह सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही सकारात्मक परिणाम होणार आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. नगराध्यक्षा सौ. श्रद्धा लखमराजे भोसले व आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी फूल मार्केटमधील विक्रेते तसेच नागरिकांना नगरपरिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या युरीनल सुविधेचा योग्य व जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. परिसरात कुठेही अस्वच्छता होणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि सावंतवाडी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.”
