सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा:तहसीलदारांकडे कारवाईची मागणी..

⚡कुडाळ ता.०२-: पिंगुळी गावाची जीवनवाहिनी असलेल्या ऐतिहासिक पाझर तलावाच्या संरक्षणासाठी तसेच देऊळवाडी येथील सर्वे क्रमांक २८/१ व २८/२ मधील २७५ भूखंडांच्या लेआउटला दिलेली अंतिम रेखांकन परवानगी रद्द करण्याच्या मागणीसाठी आजपासून कुडाळ तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनात महिला, ज्येष्ठ नागरिकांसह शेकडो ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी झाले आहेत. मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.
पिंगुळी देऊळवाडी येथील संबंधित भूखंडांच्या अंतिम रेखांकन प्रक्रियेत नियमांचे पालन झाले नसल्याचा आरोप करत गंगाराम सडवेलकर यांनी यापूर्वीच बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज सकाळी ११ वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, नेरूर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, राजन नाईक, अमरसेन सावंत, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, श्रेया परब, प्रभाकर काराणे, मंगेश मसके, संजय वेतुरेकर, भगवान रणसिंग, राजेश टंगसाळी, अन्वी बांदेकर, मंगेश चव्हाण, मिलिंद परब, बंटी खानोलकर, राजन पांचाळ, दर्शन कुडव, निर्मला पालकर, विजय प्रभू, नगरसेवक मंदार शिरसाट, भूषण तेजम आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
आंदोलनस्थळी ‘पाझर तलाव आमच्या गावचा, नाही कुणाच्या बापाचा’, ‘पिंगुळी एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणा देण्यात आल्या. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या जलसंधारणावरील ‘इरादा’ या कवितेची वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी दर्शविणारा मोठा फलकही उपोषणस्थळी लावण्यात आला होता. जलसंधारणाबाबत संवेदनशील भूमिका असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत आंदोलनस्थळी उपस्थित राहावे, अशी अपेक्षा काही वक्त्यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले की, पाझर तलावाच्या अगदी काठावर बाहेरील विकासकाकडून गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू असून, त्यामुळे परिसरातील पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. तलाव स्वतःच्या मालकीचा असल्याचे भासवून त्याची जाहिरात केली जात असून प्लॉट विक्री केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या तलावाच्या पाण्यावर परिसरातील सुमारे १,८०० नळधारक ग्रामस्थ अवलंबून आहेत. प्रस्तावित प्रकल्पातील सांडपाणी तलावात मिसळल्यास पिण्याच्या पाण्याचा हा स्रोत प्रदूषित होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. प्रकल्पासाठी जमिनीचे सपाटीकरण, मातीचे रस्ते तयार करणे आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याचा आरोपही त्यांनी केला. ग्रामस्थांच्या मागण्यांना न्याय मिळेपर्यंत या आंदोलनाला पाठिंबा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी अंतिम रेखांकन आदेशातील कथित त्रुटींचा पाढा वाचला. त्यांच्या म्हणण्यानुसार, अंतिम रेखांकन मंजूर करताना नगररचनाकार, सिंधुदुर्ग यांच्याकडून नकाशाला मंजुरी घेण्यात आलेली नाही. तसेच प्रस्ताव त्यांच्याकडे अभिप्रायासाठीही पाठविण्यात आलेला नाही. तलावाच्या पूरनियंत्रण रेषेपासून आवश्यक अंतर राखण्याच्या नियमाचे पालन झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय रेखांकनाच्या मोजणीवेळी जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाला नोटीस देण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.
रेखांकनाच्या आधारे सुरू असलेल्या सपाटीकरणामुळे माती वाहून तलावात साचत असून, विनापरवाना वृक्षतोडीमुळे तलावाला धोका निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. मंडळ अधिकारी पिंगुळी यांनी उपस्थित केलेला सांडपाणी व्यवस्थेचा प्रश्नही अंतिम आदेशात अनुत्तरित असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच तलावाच्या जाहिरातीत तरंगते उपाहारगृह, बोटिंग यांसारखे प्रकल्प दाखवून तलाव स्वतःच्या मालकीचा असल्याचे भासविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
तलावाकडे जाणाऱ्या पारंपरिक रस्त्यावर सुरक्षा रक्षक आणि बाउन्सर तैनात करून ग्रामस्थांना शेतीसाठी गुरे नेण्यास तसेच घराकडे ये-जा करण्यास अडथळा निर्माण केला जात असल्याचेही सडवेलकर यांनी सांगितले. या सर्व बाबींची चौकशी करून अंतिम रेखांकनाचा आदेश रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला.
माजी आमदार परशुराम उपरकर यांनी गरज पडल्यास या प्रश्नावर न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागणार असल्याचे सांगितले. अमित सामंत, संजय वेतुरेकर, भगवान रणसिंग, श्रेया परब, व्यंकू पांगुळ, हेमंत देशपांडे, भूषण तेजम आणि प्रसाद खानोलकर यांनीही आंदोलनाच्या भूमिकेला पाठिंबा देत आपली मते मांडली.
दरम्यान, उपोषणस्थळी तहसीलदार सचिन पाटील यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी माजी आमदार वैभव नाईक आणि परशुराम उपरकर यांनी आठ दिवसांपूर्वी निवेदन देऊनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही झाली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पिंगुळीचा पाझर तलाव हा गावाच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यावर संबंधित प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार सचिन पाटील यांनी दिले. प्रस्ताव पाठविल्यानंतर उपोषणाबाबत सकारात्मक विचार करता येईल, असे वैभव नाईक यांनी सांगितले. मात्र, अंतिम निर्णय आणि मागण्यांवरील कार्यवाही होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका ग्रामस्थांनी कायम ठेवली आहे.
