Headlines

पिंगुळी पाझर तलावाच्या हद्दीचा नकाशाच अनुपलब्ध…

तलावाच्या विहिरीत तीन पंप आढळल्याने प्रकरणाला नवे वळण:२०० मीटरमधील बांधकामांवर प्रश्नचिन्ह..

⚡कुडाळ ता.०२-: पिंगुळी येथील ऐतिहासिक पाझर तलाव वाचविण्यासाठी ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू करताच जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाला जाग आली आहे. उपोषणाची दखल घेत विभागाचे उपअभियंता वसंत मोहिते यांनी सोमवारी सायंकाळी उशिरा तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी तलावातील एका विहिरीत तीन पाण्याचे पंप आढळून आले. हे पंप तलावातील पाणी उपसून लगत सुरू असलेल्या प्रकल्पाच्या कामासाठी वापरण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता वसंत मोहिते यांनी सोमवारी कुडाळ तहसील कार्यालयातील आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पाझर तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. पिंगुळी पाझर तलावाच्या क्षेत्रात सुरू असलेली कथित अनधिकृत खोदाई, विहिरींमध्ये बसविण्यात आलेले पंप आणि तलावालगत सुरू असलेली बांधकामे व खोदाई याबाबत ग्रामस्थांनी उपअभियंता मोहिते यांचे लक्ष वेधले. या सर्व बाबींची पाहणी करून त्याचा सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.
या पाहणीदरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली. पिंगुळी पाझर तलावाचा अधिकृत नकाशाच लघु पाटबंधारे विभागाकडे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. तलावाची अचूक हद्द निश्चित करण्यासाठी भूमिअभिलेख विभाग, कुडाळ यांच्याकडे यापूर्वी तीन वेळा पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, तलावाचा नकाशा उपलब्ध नसल्याचे उत्तर मिळाल्याने हद्द निश्चिती आणि त्यानुसार पुढील कारवाई करताना तांत्रिक अडचणी येत असल्याचे मोहिते यांनी स्पष्ट केले.

२०० मीटर परिसरातील बांधकामांना परवानगी कशी ?

दरम्यान, पाझर तलावापासून हवाई अंतराच्या २०० मीटर परिसरात बांधकाम करण्यात येऊ नये, अशी तरतूद २०१८ च्या शासन निर्णयात असल्याची माहिती उपअभियंता मोहिते यांनी दिली. असे असताना तलावालगत सुरू असलेल्या बांधकामांना परवानग्या कशा मिळाल्या, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे संबंधित बांधकामांच्या परवानग्या आणि त्यामागील प्रशासकीय प्रक्रियेची तपासणी करण्याची मागणीही जोर धरत आहे.
 पिंगुळी पाझर तलावाचे एकूण क्षेत्र ४:६३:२० हेक्टर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तलावाच्या मूळ क्षेत्राचे संरक्षण, कथित अनधिकृत हस्तक्षेप आणि परिसरातील बांधकामांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
 उपअभियंता मोहिते यांच्या पाहणी अहवालात नेमके काय निष्कर्ष नोंदविले जातात, भूमिअभिलेख विभागाकडून तलावाची अधिकृत हद्द कधी निश्चित केली जाते आणि कथित अनधिकृत प्रकारांवर प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे उपोषणकर्त्यांसह पिंगुळी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

You cannot copy content of this page