विजांच्या कडकडाटासह पाऊस:भात कापणीच्या हंगामातच पावसाचे आगमन,शेतकऱ्यांवर पुन्हा आसमानी संकट

⚡कणकवली ता.०२-: शहरासह तालुक्याच्या विविध भागांत सोमवारी सायंकाळच्या वेळेत विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पाऊस अचानक सुरू झाल्याने काही काळ पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. पावसामुळे वातावरणात गारवा पसरला होता. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मात्र, दुसरीकडे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या भात कापणीच्या कामांना वेग आला असून अनेक ठिकाणी शेतकरी भात कापणी आणि भात गोळा करण्याच्या कामात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत अचानक पावसाने सुरुवात केल्याने कापणी केलेले भात भिजून गेले. आधीच शेतीच्या कामांसाठी मोठी मेहनत घेतलेल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा आसमानी संकट उभे राहिले आहे. भात कापणीचा हंगाम सुरू असतानाच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
