⚡बांदा ता.१३-:
डॉ. रंगनाथन गणित विषयाचे तज्ञ प्राध्यापक होते. १९२४ मध्ये त्यांनी मद्रास विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल म्हणून पदभार स्वीकारला. ते एक भारतीय गणितज्ञ आणि पुस्तकालय तज्ञ होते. भारतीयांमध्ये वाचन संस्कृती अधिकाधिक रुजावी यासाठी रंगनाथन यांनी ग्रंथालयशास्त्र आणि त्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले.
येथील गोगटे वाळके महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुस्तकांमुळे आपले ज्ञान समृद्ध होते. यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये वाचन संस्कृती रुजवली पाहिजे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करण्यासाठी आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये अनेक मौल्यवान ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यांचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर वापर करावा असे आवाहनही याप्रसंगी डॉ. काजरेकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत ग्रंथपाल डॉ. अनिल शिर्के यांनी केले. डॉ. शिर्के यांनी एस. आर. रंगनाथन यांच्या कार्याचा आढावा घेतला. उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. रमाकांत गावडे यांनी मानले. यावेळी स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
