कडक लॉकडाऊन राबवून नागरिकांच्या समस्येत अधिक भर पाडू नका…

मालवण सभापती अजिंक्य पाताडे यांचे जिल्हधिकाऱ्यांना निवेदन

मालवण (प्रतिनिधी) कोरोना मुळे गतवर्षी सर्वसामान्य नागरिकांनी कडक लॉकडाऊन पाळलेला आहे. या वर्षीही शासनाने लॉकडाऊनचे धोरण स्वीकारले असून त्याचा भाग म्हणून कडक निर्बंध लागू केलेले आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे यापूर्वी अनेकांचे नुकसान झाले असल्याने लॉकडाऊनची भर पाडून सर्वसामान्यांना आर्थिक संकटात आणू नये, अशी मागणी मालवणचे सभापती अजिंक्य पाताडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन सभापती अजिंक्य पाताडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे. राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाने कोवीड-१९ या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचे धोरण स्विकारले आहे. मुळातच गतवर्षी सर्वसामान्य नागरीकांनी चार महिने कडक लॉकडाऊन पाळलेला आहे. त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली परंतु कोवीड- १९ चे संकट आहे तसे राहिले आणि याही वर्षी प्रशासनाचा लॉकडाऊन संदर्भात विचार आहे आणि त्याचाच भाग म्हणून कडक निर्बंध लागू केलेले आहेत. परंतू निर्बंध आणि लॉकडाऊन करुन कोवीड-१९ संपुष्टात येणार नाही आणि लॉकडाऊन आणि निर्बंध पुढील कालावधीसाठी वाढतच जाणार आहे. या आजाराची दाहकता शंभर टक्के सर्वांना लस देऊनच कमी होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व नागरीकांना लस मिळेल याची अधिक प्रभावी उपाय योजना करावी, असे पाताडे यांनी म्हटले आहे. अगोदरच मेटाकुटीला आलेल्या व्यवसायिकांना लॉकडाऊनची भर पाडून आर्थिक संकटात आणू नये. मुळात लॉकडाऊन मुळे हातावर पोट-पाणी असलेले मजूर, छोटे मोठे व्यवसायिक ,खाजगी अस्थापनेवरील कर्मचारी यांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही आणि जनता लॉकडाऊन पाळण्याच्या मनस्थितीत नाही याचा सारासार विचार व्हावा असेही सभापती श्री., पाताडे यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page